पुण्यातील कोंढव्यात हाॅटेल चालकावर कोयता गँगचा हल्ला
हल्ल्याची घटना सीसीटीव्हीत कैद, परिसरात दहशतीचे वातावरण, कोयता गँगचा धुडगूस सुरूच?
पुणे दि १७(प्रतिनिधी)- पुण्यात कोयत्याची दहशत कमी होण्याचे नाव घेत नाही. पण आता पुन्हा एकदा कोयत्याची दहशत समोर आली आहे. कारण पुण्यातील कोंढवा भागात बिलावरून तीन जणांच्या टोळक्याने हॉटेल चालकावर कोयत्याने हल्ला केला आहे. ही घटना हॉटेलच्या सीसीटीव्हीत कैद झाली आहे.
पुण्यात मोठ्या प्रमाणात कोयता गँगची दहशत माजवता दिसत आहे. अशा अनेक घटना समोर आल्या आहेत. कोंढव्यातील तिघेजण एका हाॅटेलमध्ये गेले होते. त्यावेळी त्यांचा हाॅटेल चालकाबरोबर वाद झाला. सीसीटीव्हीत दिसत आहे की, दोन तरुण हाॅटेल चालकाबरोबर वाद घालत होते. पण अचानक त्यातील एकाने थेट कोयता काढत हाॅटेल चालकावर हल्ला केला. मात्र, ऐनवेळी चालकाने हात पकडल्याने अनर्थ टळला. यावेळी टोळक्याकडून हाॅटेलची नासधूस करण्यात आली आहे. हा सगळा प्रकार हाॅटेलच्या सीसीटीव्हीत कैद झाला आहे. पण एैन वर्दळीच्या ठिकाणी हा प्रकार घडल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान गेल्या अनेक महिन्यांपासून शुल्लक कारणांवरून पुणे शहरात कोयता वापरून दहशत माजवण्याचे प्रकार सुरू आहेत.
पुण्यात सातत्याने कोयता गँगच्या दहशतीच्या घटना समोर आल्या आहेत. पोलीसांनी त्यांच्या मुसक्या आवळून कारवाई देखील केली आहे. तरीही हे प्रकार सुरुच आहेत. पुणे पोलिसांनी शहरात कोंबिंग ऑपरेशन राबवायला देखील सुरुवात केली आहे. पण या टोळक्यात अल्पवयीन मुलांचा वाढता सहभाग चिंतेचा विषय आहे.