‘गाडी पार्किंगला का लावली’ म्हणत कोयत्याने गंभीर मारहाण
मारहाणीचा सीसीटीव्ही समोर, पुण्यात मारहाणीच्या घटनांमध्ये मोठी वाढ
पुणे दि ३(प्रतिनिधी)- नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी मुंबईवरुन लोणावळ्यात आलेल्या एका पर्यटकाला पार्किंगच्या वादातून स्थानिकांनी जबर मारहाण केल्याची घटना घडली आहे. यावेळी गाडीचीही तोडफोड करण्यात आली. यात पर्यटक जखमी झाला असुन त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मारहाणीचा सीसीटीव्ही देखील समोर आला आहे.
नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने लोणावळ्यात येत असतात. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार निरजकुमार तिवारी आणि त्यांचे चार मित्र नववर्षाच्या स्वागतासाठी लोणावळ्यात आले होते. यावेळी ३१ डिसेंबरला रात्री भूक लागली म्हणून ते मॅगी पॉईंटवर आले होते. ते त्या ठिकाणी गाडी पार्क करत असताना स्थानिक तरुणांनी या ठिकाणी वाहन का उभे केले म्हणून वाद घालण्यास सुरूवात केली. पण त्यानंतर त्यांनी निरजकुमार आणि त्याचे मित्र हर्ष यांना कोयत्याने गंभीर मारहाण करत जखमी केले. तसेच वाहनांची तोडफोड करत फरार झाले. पोलिसांना या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना रुग्णालयात दाखल केले.संशयित आरोपींवर गुन्हा दाखल केला असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध सुरू आहे.
लोणावळ्यात दुस-या एका घटनेत पर्यटकांनी स्थानिक तरूणांना मारहाण आणि शिविगाळ केल्याची घटना घडली होती. दरम्यान मारहाणीच्या घटनेमुळे लोणावळा परिसरात खळबळ उडाली असून या निमित्ताने पर्यटकांच्या सुरक्षेचा मुद्दा एैरणीवर आला आहे.