Latest Marathi News

चिंचवडचे भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांचे निधन

कर्करोगाशी झुंज अपयशी, मुळ्या टिळक यांच्यानंतर भाजपाला दुसरा धक्का

चिंचवड दि ३(प्रतिनिधी)- भारतीय जनता पक्षाचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे दीर्घ आजारामुळे निधन झाले. पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरु असताना आज मंगळवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पुण्यातील चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार लक्ष्मण जगताप हे अनेक दिवसांपासून कर्करोगाशी झुंज देत होते. ते ५९ वर्षांचे होते.

लक्ष्मण जगताप मागील काही दिवसापासून कर्करोगाशी झुंज देत होते. मध्यंतरी अमेरिकेहून मागविलेल्या इंजेक्शनमुळे आमदार जगतापांच्या प्रकृतीत लक्षणीय सुधारणा झाली होती. त्यांनी कामाला देखील सुरूवात केली होती. जूनमध्ये ते विधान परिषदेच्या मतदानासाठी रुग्णवाहिकेतून मतदानाला गेले होते. त्यावेळी मोठी चर्चा झाली होती. लक्ष्मण जगताप यांची राजकीय कारकीर्द काॅंग्रेस पक्षापासून सुरू झाली. १९९२ च्या निवडणुकीत ते नगरसेवकपदी निवडून आले.‌ १९९७ च्या निवडणुकीतही ते निवडून आले. सलग दहा वर्षे त्यांनी पिंपळे गुरवचे प्रतिनिधित्व केले. १९९३-९४मध्ये ते महापालिका स्थायी समिती सभापती होते. १९९८ मध्ये अस्तित्वात आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यांनी प्रवेश केला. त्यानंतर ते पिंपरी चिंचवडचे महापाैर देखील झाले. मात्र, २००३-०४ मध्ये झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी स्थानिक स्वराज्य संस्था गटातून त्यांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली. त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली. त्यामुळे त्यांनी बंडखोरी केली. विधान परिषदेची निवडणूक अपक्ष लढवून विजय मिळवला.तसेच २०१४ ची विधानसभा निवडणूक भाजपतर्फे लढवून विजय मिळवला. तर २०१९ सालीही ते विजयी झाले होते. पण आज अखेर त्यांची प्राणज्योत मालवली आहे.

पुण्यातील कसबा पेठ मतदारसंघातील भाजप आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनातून पक्ष सावरत असतानाच त्यांना आणखी एक धक्का बसला आहे. जगताप यांच्या निधनामुळे पिंपरी चिंचवड शहरात तसेच चिंचवड मतदार संघात शोककळा पसरली आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!