पुणे दि १८(प्रतिनिधी)- पुण्यातील हडपसर भागातील शेवाळवाडीत मजुराचा खून करण्यात आल्याची घटना घडली. या प्रकरणी एका मजुराच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनैतिक संबंधातून खून झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणी हडपसर पोलीसांनी आरोपीचा शोध सुरु केला आहे.
अरुण किसन सूर्यवंशी असे खून झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणी पिताराम केवट याच्या विराेधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, तो पसार आहे. मिळालेल्या माहितीनुसार आरोपी पिताराम आणि अरुण शेवाळेवाडीत शेजारी होते. दोघे एकाच नर्सरीत कामाला होते. कामावरुन घरी आल्यानंतर दोघेही दारु पिण्यासाठी गेले होते. पिताराम घरी आला पण अरुण घरी परत न आल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी तो बेपत्ता असल्याची तक्रार दिली. पण मांजरीतील ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्राच्या परिसरातील मोकळ्या जागेत अरुणचा मृतदेह सापडला. त्यानंतर पोलीसांनी तपासाची चक्रे फिरली.
घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त विक्रम देशमुख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद गोकुळे, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिगंबर शिंदे, विश्वास डगळे यांनी घटनास्थळी भेट दिली.यावेळी चाैकशीत पिताराम हा पत्नीच्या चारित्र्याचा संशय घेत होता. त्यातूनच अरुणचा खून झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. पुढील तपास सुरु आहे.