शिंदेना धक्का देत भाजपाची पुन्हा एकदा शिंदे गटावर ‘दादा’गिरी
या आयोगावरून चक्क मुख्यमंत्र्यांनाच डावलले, दादांची लाॅटरी
मुंबई दि १८(प्रतिनिधी)- महाविकास आघाडी सरकारच्या काळात घेण्यात आलेला उच्च शिक्षण आयोगाची स्थापना करण्याचा निर्णय सध्याच्या सरकारने कायम ठेवला असला, तरी या आयोगाच्या अध्यक्षपदी मुख्यमंत्र्यांऐवजी उच्च व तंत्रशिक्षणमंत्र्यांची वर्णी लागणार आहे. त्यामुळे भाजपाने आता थेट मुख्यमंत्र्यांनाच डच्चू दिला आहे. याची जोरदार चर्चा आहे.
महाविकास आघाडी सरकारने राज्यातील सरकारी, अनुदानित, विनाअनुदानित शिक्षण संस्था; तसेच विद्यापीठांमध्ये समन्वय साधावा, यासाठी उच्च शिक्षण आयोगाची स्थापना करण्याचा निर्णय महाविकास आघाडीने घेतला होता. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली असणाऱ्या या आयोगामध्ये उच्च शिक्षण विभागाचे मंत्री, विभागातील उच्चपदस्थ अधिकारी या शिवाय राज्यातील उच्चशिक्षण विषयाचा दीर्घ अनुभव असलेले तज्ज्ञ सदस्य म्हणून काम करणार होते. पण नवे सरकार अस्तित्वात आल्यानंतर भाजपाने एकनाथ शिंदे यांचाच पत्ता कट केला आहे. भाजपा आणि शिंदे गटात अनेक वाद समोर आले आहेत भाजप शिंदे गटावर दबाव टाकत असल्याची चर्चा नेहमी होत असते. पण आता थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना डच्चू देत आपणच या सरकारमध्ये प्रमुख असल्याचे दाखवून दिले आहे. चंद्रकांत पाटील या आयोगाचे अध्यक्ष असणार आहेत.

आयोगामध्ये एकूण १९ सदस्यांची व्यवस्थापन समिती तयार करण्यात आली आहे. यामध्ये अध्यक्ष म्हणून उच्च व तंत्रशिक्षण मंत्री, याच विभागाचे राज्यमंत्री, उच्च शिक्षण संचलनालय, तंत्रशिक्षण संचलनालयाच्या संचालकांसह, उच्च शिक्षण विभागाचे सचिव, मुख्य कार्यकारी अधिकारी व वेगवेगळ्या विषयांवर काम करणारे सदस्य असणार आहेत. उच्च व तंत्रशिक्षण विभाग या सदस्यांची नेमणूक करणार असून, राज्यपालनियुक्त एक सदस्य या आयोगावर असणार आहे.