
घरमालकांनो भाडेकरूची माहिती सादर करा अन्यथा..
हडपसर पोलिसांचे घरमालकांना आवाहन, पुण्यात दहशतवादी सापडल्याने पोलिस अलर्ट मोडवर
पुणे दि २६(प्रतिनिधी)- पुण्यात दोन दहशतवादी पकडल्यानंतर त्यांच्याकडून रोज धक्कादायक खुलासे केले जात आहेत. तसेच ते नाव बदलून पुण्यात राहत असल्याचेही निदर्शनास आले आहे. तसेच ते ज्या ठिकाणी राहत होते. त्या ठिकाणी भाडेकराराची कायदेशीर प्रक्रिया करण्यात आलेली नव्हती. पण आता मात्र पुणे पोलीसांकडुन भाडेकरुंची माहिती सादर करण्याचे आवाहन केले आहे.
घरमालकाने घर भाड्याने देताना भाडेकरार करून तो पोलीसठाण्यात सादर करणे बंधनकारक आहे. मात्र, अनेक घरमालकांनी भाडेकरू ठेऊनही त्याची माहिती पोलीसठाण्यात दिलेली नाही. त्यामुळे हडपसर पोलीसांनी माहितीपत्रकाद्वारे माहिती सादर करण्याचे आवाहन केले आहे. हडपसर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके यांनी याबाबत माहिती देताना म्हणाले की, भाडेकरूबाबतचा कायदा होऊनही अनेक मिळकतदार त्याकडे दुर्लक्ष करीत आहेत.भाडेकरूची माहिती न ठेवल्यामुळे काही समाजकंटक त्याचा फायदा उठवत आहेत. यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे मिळकतदाराने भाडेकरू ठेवताना भाडेकरूच्या चरित्र प्रमाणपत्रासह सर्व आवश्यक कागदपत्रे पूर्ण करून घ्यावेत. त्याची माहिती पोलिसांना वेळेत सादर करावी. सुरक्षेच्या दृष्टीने हे गरजेचे आहे असे शेळके यांनी सांगितले आहे. कोंढवा येथे दोन दहशतवाद्यांना ताब्यात घेतल्यानंतर भाडेकरूची माहिती ठेवण्याचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. त्यामुळे पुणे आणि परिसरात प्रशासकीय पातळीवरून देखील माहिती सादर करण्याचे आवाहन केले जात आहे.
हडपसर पोलीसांनी एक पत्रक प्रकाशित करून भाडेकरारासह भाडेकरूची संपूर्ण माहिती पोलीसठाण्यात जमा करण्याचे आवाहन केले आहे. पण त्यामध्ये टाळाटाळ झाल्यास घरमालकावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे.