Latest Marathi News
Ganesh J GIF

अन्नदात्याला लुबाडणाऱ्या खत-बियाणे कंपन्यांवर काय कारवाई करणार?

शेतकऱ्यांच्या फसवणुकीच्या तक्रारीही घेतल्या जात नाहीत, मुंबई विद्यापीठाचे निकाल वेळेवर लावण्याची विनंती

मुंबई दि २६(प्रतिनिधी)- जगाचा पोशिंदा असलेल्या अन्नदात्याला खत, बियाणे कंपन्या लुबाडत आहेत. बोगस बियाणे विकून शेतकऱ्यांची सर्रास फसवणूक केली जात आहे. सरकारचा कृषी विभाग राज्यभर आहे पण अशा कंपन्यावर सरकारचा वचक राहिलेला दिसत नाही. शेतकऱ्याला लुबडणाऱ्या, त्याची फसवणूक करणाऱ्या मुजोर कंपन्यांवर सरकार काय कारवाई करणार आहे, याची विचारणा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी विधानसभेत केली आहे.

कृषी विषयावरील चर्चेवर बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, खते, बियाणे, किटनाशक कंपन्यांचे साठेलोटे आहे, या कंपन्या शेतकऱ्यांना लुटत आहेत. बोगस बियाणामुळे पीक उगवत नाही, त्यामुळे शेतकऱ्यांचे वर्ष वाया जाते, आर्थिक नुकसानही होते. पण शेतकऱ्यांच्या तक्रारीही घेतल्या जात नाहीत. यातून शेतकरी उद्ध्वस्थ होतो व आत्महत्या करण्यास प्रवृत्त होतो. शेतकऱ्याची लुबाडणुक काही थांबत नाही, ‘कुंपणच शेत खात आहे’ अशी परिस्थिती आहे. शेतकऱ्यांना फसवणाऱ्यांना कठोर शिक्षा करण्यासाठी कायदे करण्याची भाषा केली जात आहे पण सध्या अस्तित्वात असलेल्या फसवणुकीच्या कायद्याखालीसुद्धा कारवाई करता येते. शेतकऱ्यांना फसवणाऱ्या व्यवस्थेवर लगाम लावण्याची भूमिका घेतली पाहिजे. सरकार शेतकऱ्याला फसवणाऱ्या कंपन्यांवर कोणती कारवाई करत आहे यावर भूमिका स्पष्ट करावी. कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी या प्रश्नाला उत्तर देताना असे म्हटले की, शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या कंपन्यांवर कृषी विभाग कडक कारवाई करत आहे. तीन कंपन्यांवर कारवाई केलेली आहे व अशा कारवाया सुरुच आहेत, असे कृषी मंत्र्यांनी सांगितले आहे.

दुसरीकडे मुंबई विद्यापीठासंबंधी प्रश्न उपस्थित करण्यात आला. मुंबई विद्यापीठाचे विविध विषयांचे निकाल उशिरा लागतात, काही परीक्षांचे निकाल हे लागून गेले आहेत पण अजूनही विद्यार्थ्यांना सर्टिफिकेट देण्यात आलेले नाहीत, या मुळे होणाऱ्या नुकसानीची जबाबदारी कोणाची, हे निश्चित केले पाहिजे, अशा शब्दात विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी सरकारला घेरले, त्यावर अध्यक्षांनी या संदर्भात उचित जबाबदारी निश्चित करण्याचे सरकारला निर्देशित केले आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!