मुंबई दि ११ (प्रतिनिधी)- राज्यात शिंदे सरकार स्थापन झाल्यापासून शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यातील संघर्ष टोकाला गेला आहे. अनेक मुद्द्यांवरून त्यांच्यात खटके उडत आहेत. खरी शिवसेना आपली असा दावा दोन्ही गटाकडून केला जातोय. अशातच अनुक्रमे विधानसभा विधानपरिषदेत शिंदे गट आणि ठाकरे गटाला स्थान देण्यात आल्याने थोडी खुशी थोडा गम अशी स्थिती झाली आहे.
शिवसेनेने कामकाज समितीच्या बैठकीत समावेश करावा, यासाठी विधिमंडळाला पत्र दिले होते. विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर यांनी हे पत्र नाकारत शिंदे गटाच्या दादा भुसे, उदय सावंत या दोघांचा समावेश केला आहे. विधानसभेच्या विधिमंडळ कामकाज समितीतून डावलल्यामुळे शिवसेनेसाठी हा मोठा हादरा मानला जातो आहे. विधानपरिषदेत शिंदे गट अस्तित्वातच नाहीये. यामुळे तिथे ठाकरे गटाचा समावेश करण्यात आला आहे. कामकाज समितीत ठाकरे गटाचे अंबादास दानवे आणि अनिल परब यांच्या नावाचा समावेश करण्यात आला आहे. एकीकडे विधानसभेत ठाकरे गटाला धक्का बसला असतानाच, आता दुसरीकडे विधानपरिषदेत शिंदे गटाला मोठा धक्का बसला आहे.
एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पायउतार व्हावे लागले. राज्यातील महाविकास आघाडी सरकारही कोसळले. शिवसेनेच्या तब्बल ४० आमदार, १२ खासदारांनी बंडखोरी करत शिंदे गटाला पाठिंबा दिला. त्यामुळे शिवसेना, धनुष्यबाण चिन्ह कुणाचे हा वाद सर्वोच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट आहे.