मुंबई दि ११(प्रतिनिधी)- शिंदे – फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार पार पडल्यानंतर शिंदे गटातील सहा आमदार नाराज असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे. शिंदे गटातील मंत्रिपदाचे प्रबळ दावेदार असलेल्या आणि तीन टर्म आमदार असलेल्या काही आमदारांना अद्याप मंत्रिपद न मिळाल्यामुळे खासगीत त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.त्यामुळे शिंदेगटातील नाराजी नाट्य वादळी ठरण्याची शक्यता आहे.

मंत्रिमंडळ विस्तारात एकनाथ शिंदे गटाच्या संजय शिरसाट, प्रताप सरनाईक, बालाजी किणीकर, बच्चू कडू, आशिष जयस्वाल, सदा सरवणकर यांना स्थान मिळू शकलेले नाही, त्यामुळे ते नाराज आहेत. तसेच लता सोनावणे, यामिनी जाधव आणि मंजुळा गावित यांच्यापैकी एकाही महिला आमदाराला मंत्रिमंडळात स्थान न दिल्यामुळे त्यांच्यातही नाराजी आहे. अपक्ष आणि छोट्या पक्षाच्या आमदारांना तुम्हाला संधी द्यावीच लागेल, महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळात आम्ही होतो, असं सांगत प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडूंनी आपली नाराजी जाहीर केली. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी त्यांना संयम राखण्याचे आवाहन केले. आणखी किमान तीन कॅबिनेट मंत्रिपदे आणि पाच ते सहा राज्यमंत्रिपदे मिळणार आहेत. त्यात तुम्हाला संधी नक्की मिळेल, असा शब्द शिंदेनी नाराजांना दिला आहे.
शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळात महिलेला स्थान दिलेलं नाही. त्यावरून शिंदे-फडणवीस सरकारवर विरोधकांकडून टीका करण्यात आली होती. आता दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तार लवकर होण्याची शक्यता धूसर असून, त्याला तीन महिन्यांचा कालावधी लागू शकतो. त्यामुळे शिंदे गटाचे मंत्रिपद न मिळालेले आमदारही नाराज होण्याची शक्यता आहे.