अजित पवार गटाचे लोकसभेचे मतदारसंघ व उमेदवार ठरले?
अजित पवार गटाचा लोकसभेच्या या मतदारसंघावर दावा, महायुतीत वादाची ठिणगी, पहा मतदारसंघ आणि उमेदवार
मुंबई दि १८(प्रतिनिधी)- सध्या सर्वच राजकीय पक्षांना आगामी लोकसभा निवडणुकांचे वेध लागले आहेत. याच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी अजित पवार गटाने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. महायुतीमध्ये अजित पवार गट लोकसभेच्या ९ जागांसाठी आग्रही आहे. त्यामुळे महायुतीत जागावाटपावरुन वादविवाद होण्याची शक्यता आहे.
अजितदादा पवार गटाकडे सध्या एकच खासदार आहे. पण २०१९ साली राष्ट्रवादीचे चार खासदार निवडून आले होते. त्यामुळे त्या चार जागांबरोबरच अजित पवार गट आणखी पाच मतदारसंघासाठी आग्रही आहे. अजित पवार गटाने बारामती, सातारा, रायगड, शिरूर या आपल्या हक्कांच्या जागांसह धाराशिव, परभणी, दक्षिण मुंबई, भंडारा-गोंदिया आणि छत्रपती संभाजीनगर या जागांसाठी आग्रह धरला आहे. विशेष म्हणजे या शिंदे गटाच्या जागा आहेत. त्यामुळे आगामी काळात प्रत्यक्ष जागावाटपात जोरदार रस्सीखेच होण्याची शक्यता आहे. अजित पवार गटातील संभाव्य उमेदवारांना मतदारसंघात चाचपणी करण्याची वरिष्ठांनी सूचना केल्याची माहिती आहे. त्यामुळे महायुतीतील भाजप आणि शिवसेना अस्वस्थ झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. विशेष म्हणजे अजित पवार गटाने आपले संभाव्य उमेदवार देखील घोषित केले आहेत. महत्वाचे म्हणजे यासाठी अजित पवार गटाने शिंदे गट, काँग्रेस आणि भाजपातील काही नेत्यांना आपल्याकडे खेचण्यात यश मिळवले आहे. त्यामुळेच अजित पवार गटाने नऊ जागांची मागणी केली आहे. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गृहमंत्री अमित शाह यांची दिल्लीत भेट घेतली. या भेटीत यावर चर्चा झाली असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. बारामती लोकसभा मतदारसंघातून सुनेत्रा पवार या उमेदवार असल्याने पवार गटात आलबेल नसल्याचे चित्र आहे. अर्थात भाजपा आणि शिंदे गट काय भुमिका घेणार हे पाहणे देखील महत्त्वाचे ठरणार आहे.
अजित पवार गटाचे संभाव्य उमेदवार
१) बारामती – सुनेत्रा पवार
२) सातारा – रामराजे नाईक निंबाळकर
३) रायगड – सुनिल तटकरे
४) शिरूर – शिवाजीराव आढळराव पाटील
५) दक्षिण मुंबई – काँग्रेस मधील बडा चेहरा
६) परभणी- राजेश विटेकर
७) भंडारा गोंदिया – प्रफुल्ल पटेल
८) धाराशिव – राणा जगजितसिंह
९) छत्रपती संभाजीनगर – सतीश चव्हाण