नामदेव जाधवांना शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी फासले काळे
शरद पवारांवर टिका करत मराठा नसल्याचे केले होते वक्तव्य, काळे फासतानाचा व्हिडिओ व्हायरल, पोलिसांची धडपड
पुणे दि १८(प्रतिनिधी)- राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा समोर आल्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे मराठा नसून ओबीसी असल्याचा दावा करणारे नामदेव जाधव यांना आज पुण्यात शरद पवार गटाकडून काळे फासण्यात आले आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून विरोध झाल्यानंतर नामदेव जाधव यांचा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे.
लेखक नामदेव जाधव हे भांडरकर इन्स्टिट्यूटमध्ये कार्यक्रमासाठी पुण्यात आले होते. यावेळी बाहेर प्रसारमाध्यमांशी संवाद साधत असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी जाधव यांना काळे फासले. विशेष म्हणजे पोलीसांनी जाधव यांच्या कार्यक्रमाला परवानगी नाकारली होती. कारण राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून नामदेव जाधव यांना काळ फासण्याचा इशारा देण्यात आला होता. नामदेव जाधव यांना काळं फासण्यात येत होतं, त्यावेळी पोलिसांनी त्यांचा बचाव करण्याचा प्रयत्न केला. पण शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना काळे फसले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. शरद पवार यांच्या जात प्रमाणपत्रावर कुणबी नोंद असल्याचा दावा नामदेव जाधव यांनी केला होता. तसंच शरद पवार यांच्याविरोधात वक्तव्य केलं होतं. मराठा समाजाला आरक्षण न मिळण्यामागे शरद पवार कारणीभूत असल्याचा दावा नामदेव जाधव यांनी केला होता. पण शरद पवार यांनी आपण मराठा असल्याचे स्पष्ट केले होते. त्यानंतर हा प्रकार घडला आहे. लोकशाहीत विचार मांडण्याचा अधिकार आहे. पोलिसांकडे विचारणा करणार आहे. जर मी पुरावे घेऊन बोलतोय तर तुम्ही पण तसेच बोलले पाहिजे. विचारांची लढाई आहे विचाराने लढली पाहिजे. अशी प्रतिक्रिया जाधव यांनी दिली आहे. दरम्यान शरद पवार गटाच्या नेत्यांकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.
नामदेवराव जाधव हे प्राध्यापक,लेखक आणि व्याख्याते आहेत. त्यांनी ‘शिवाजी द मॅनेजमेंट गुरु’ हे पुस्तक लिहिलं आहे. तसंच आपण जिजाऊंचे वंशज आहोत असा दावा त्यांच्या फेसबुक पेज आणि X या सोशल मीडिया साईटवर केला होता. पण तो देखील चुकीचा असल्याचा दावा काही इतिहासकरांनी आणि मा जिजाऊंच्या वंशजांनी केला आहे. लवांडे यांनी तर याविरोधात पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देखील दाखल केली आहे.