Latest Marathi News
Ganesh J GIF

संघाच्या समन्वय बैठकीत प्रमुख राष्ट्रीय मुद्द्यांवर होणार चर्चा

सामाजिक परिवर्तनासाठीचे प्रयत्नावर होणार चर्चा, राष्ट्रीय महत्त्वाच्या मुद्यांचा चर्चेत समावेश

पुणे दि १३(प्रतिनिधी)- स्वयंसेवक संघाची अखिल भारतीय समन्वय बैठक २०२३ पुणे येथे होत असून या बैठकीत ३६ संघटनांचे २६६ प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. पर्यावरणपूरक जीवनशैली, जीवनमूल्यांवर आधारित कुटुंबव्यवस्था, समरसतेचा आग्रह, स्वदेशी आचरण आणि नागरी कर्तव्यांचे पालन या पाच मुद्द्यांवर बैठकीत चर्चा होणार असल्याची माहिती रा. स्व. संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनीलजी आंबेकर यांनी दिली आहे.

रा. स्व. संघ समन्वय समितीच्या दि. १४, ते १६ सप्टेंबर दरम्यान होणाऱ्या बैठकीची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत आंबेकर बोलत होते. संघाच्या पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे कार्यवाह डॉ. प्रवीण दबडघाव यावेळी उपस्थित होते. आंबेकर म्हणाले की, संघाचे स्वयंसेवक आपल्या शाखा कार्याच्या माध्यमातून देशसेवेचे कार्य अविरत करत असतात. दैनंदिन शाखेच्या कामाबरोबरच समाजजीवनाच्या विविध क्षेत्रात संघाचे कार्यकर्ते विविध सामाजिक कामांमध्ये मग्न असतात. ही सर्व कामे समाजसेवा आणि राष्ट्र उभारणीसाठी सुरू आहेत. बैठकीत सहभागी होणार्‍या सर्व संघटना संघप्रेरित असून सामाजिक जीवनाच्या विविध क्षेत्रात त्या स्वायत्तरितीने कार्य करतात. या संघटनांची बैठक वर्षातून एकदा आयोजित केली जाते. या बैठकीत या संघटना त्यांचे कार्य व त्यातील अनुभवांची परस्परांमध्ये देवाणघेवाण करतात. या निमित्ताने एकमेकांकडून शिकण्याची आणि एकमेकांना समजून घेण्याची संधी मिळते. या सर्व संघटनांचे उद्दिष्ट आणि लक्ष्य समान आहे. अनेक संघटना विषयानुरूप आणि आवश्यकतेनुसार एकत्र येऊन कार्य करतात. जवळपास जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात काम करणाऱ्या विविध संघटनांचे प्रतिनिधी बैठकीत सहभागी होणार आहेत. या साऱ्या संघटना अनेक वर्षांपासून समाजजीवनात सक्रिय असून त्यांनी आपल्या परिश्रमाने आपापल्या क्षेत्रात महत्त्वाचे स्थान प्राप्त केले आहे. या संघटना आपापल्या कार्यक्षेत्रातील त्यांचे अनुभव बैठकीत मांडतील. तसेच राष्ट्रीय आणि वर्तमान परिस्थितीच्या संदर्भातील अनुभव देखील सांगितले जातील. त्यासंबंधित अनेक विषयांवर बैठकीत मूलभूत चिंतन होईल आणि त्या-त्या संघटनांची आपापल्या क्षेत्रातील आगामी कार्याची दिशा काय राहील याचीही योजना बैठकीत मांडली जाईल, असे आंबेकर म्हणाले.

या बैठकीत विद्या भारती, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, सक्षम, वनवासी कल्याण आश्रम, सेवा भारती, विश्व हिंदू परिषद, राष्ट्र सेविका समिती, भारतीय जनता पार्टी, भारतीय मजदूर संघ, भारतीय किसान संघ आणि अन्य सहयोगी संघटनांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!