Latest Marathi News
Ganesh J GIF

पुणे विधान परिषद निवडणूक: पार्थ पवारांच्या मध्यस्थीनंतर सुनील टिंगरेंची माघार

पुणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीतील राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षांतर्गत असलेला हायव्होल्टेज ड्रामा अखेर संपला आहे. गेल्या २४ तासांपासून सुरू असलेल्या तीव्र राजकीय घडामोडींनंतर, माजी आमदार आणि शहराध्यक्ष सुनील टिंगरे यांनी आज अखेर निवडणुकीतून आपली माघार घेतली आहे. पक्षाचे तरुण नेते पार्थ पवार यांच्या मध्यस्थीनंतर हा वाद मिटवण्यात महायुतीला यश आले आहे.

‘जिजाई’ बंगल्यावर खलबतं आणि पार्थ पवारांचं आश्वासन

उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या टप्प्यात घडामोडींना प्रचंड वेग आला होता. पार्थ पवार यांनी सुनील टिंगरे यांना ‘जिजाई’ बंगल्यावर चर्चेसाठी बोलावून घेतले. या बैठकीला पार्थ पवार, विक्रम काकडे आणि सुनील टिंगरे हे तिघेही उपस्थित होते. या बैठकीत पार्थ पवार यांनी टिंगरे यांची समजूत काढली आणि “पक्षात तुम्हालाही योग्य न्याय दिला जाईल,” असे महत्त्वाचे आश्वासन दिले. पार्थ पवारांच्या या आश्वासनानंतर सुनील टिंगरे यांनी मवाळ भूमिका घेत निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय घेतला.

‘एबी फॉर्म’मुळे वाढला होता सस्पेन्स!

उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसकडून अत्यंत नाट्यमय पावले उचलली गेली होती. सुरुवातीला भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी खासदार संजय काकडे यांचे पुत्र आणि पार्थ पवार यांचे निकटवर्तीय विक्रम काकडे यांना उमेदवारी देण्याचे निश्चित झाले होते. मात्र, पक्षात बाहेरून आलेल्या (आयात) उमेदवाराला स्थानिक निष्ठावंतांनी तीव्र विरोध केला.या विरोधामुळे निर्माण झालेली कोंडी फोडण्यासाठी पक्षाने ऐनवेळी सुनील टिंगरे यांनाही उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सांगितले. धक्कादायक बाब म्हणजे, काकडे आणि टिंगरे या दोघांनाही पक्षाने अधिकृत ‘एबी फॉर्म’ दिला होता. त्यामुळे राष्ट्रवादीचा नेमका अधिकृत उमेदवार कोण? याबाबतचा सस्पेन्स आणि संभ्रम काल रात्रीपर्यंत कायम होता, जो आज टिंगरेंच्या माघारीने दूर झाला आहे.

निष्ठावंतांना डावलल्याने कार्यकर्त्यांमध्ये तीव्र संताप

विधान परिषदेच्या १७ जागांसाठी महायुतीत झालेल्या जागावाटपात अजित पवार गटाच्या वाट्याला पुणे आणि रायगड हे दोन महत्त्वाचे मतदारसंघ आले आहेत. मात्र, पुण्यात उमेदवारी जाहीर होताना पक्षात मोठी धुसफूस पाहायला मिळाली. रविवारी रात्री पुण्यात तब्बल पाच तास चाललेल्या बैठकीनंतर विक्रम काकडे यांचे नाव समोर आले.या निर्णयामुळे दिलीप मोहिते, रमेश थोरात, विलास लांडे आणि स्वतः सुनील टिंगरे यांसारख्या पक्षातील जुन्या आणि निष्ठावंत इच्छुकांना थेट डावलण्यात आले होते. “पक्षासाठी वर्षानुवर्षे राबणाऱ्या कार्यकर्त्यांना डावलून बाहेरून आलेल्या व्यक्तीला थेट उमेदवारी का?” असा संतप्त सवाल उपस्थित करत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार नाराजी व्यक्त केली होती.

विक्रम काकडेंचा मार्ग मोकळा

सुनील टिंगरे यांनी माघार घेतल्यामुळे आता पुणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विक्रम काकडे हेच राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुतीचे अधिकृत उमेदवार असतील हे स्पष्ट झाले आहे. टिंगरेंनी माघार घेतली असली, तरी नाराज झालेल्या जुन्या निष्ठावंत कार्यकर्त्यांची आणि नेत्यांची मनधरणी करण्याचे मोठे आव्हान आता महायुतीच्या नेत्यांसमोर असणार आहे.

 

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!