
मराठ्यांचा विजयोत्सव! मराठा समाजापुढे सरकार झुकले मागण्या मान्य
माझी लेकरं सुखी राहतील म्हणत जरांगे पाटील यांनी उपोषण सोडले, मराठा समाजाच्या या मागण्या मान्य
मुंबई – मराठा आरक्षणासाठी उपोषणास बसलेले मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनास अखेर मोठे यश आले असून सरकारने बहुतांश मागण्या मान्य केल्या आहेत. त्यामुळे मराठा समाजाच्या आंदोलनाला प्रखर लढ्यानंतर मोठे यश आले आहे.
मनोज जरांगे पाटलांनी हैद्राबाद गॅझेटिअरची अंमलबजावणी करण्यात यावी ही मागणी केली होती. त्यावर सरकारने हैद्राबाद गॅझेटिअरच्या अंमलबजावणीसाठी मान्यता दिली आहे. सातारा संस्थानच्या गॅझेटिअरमध्ये पश्चिम महाराष्ट्र पूर्ण बसतो. सातारा गॅझेटिअर, पुणे औंध गॅझेटिअरच्या आधीन राहून अंमलबजावणी करण्याची आपली मागणी होती. सातारा आणि औंध गॅझेटिअरची कायदेशीर तपासून जलदगतीने निर्णय घेऊ असं सरकारने म्हटलं आहे. मराठा आंदोलकांवरील गुन्हे सप्टेंबर अखेरपर्यंत मागे घेण्याचे आश्वासन सरकारने दिले आहे. आंदोलनात बलिदान दिलेल्या व्यक्तींना तात्काळ मदत आणि नोकरी देण्याची मागणी केली होती. कुटुंबीयांच्या वारसांना १५ कोटी मदत यापूर्वी दिली आहे. उर्वरीत कुटुंबीयांना एका आठवड्याच्या आत आर्थिक मदत खात्यावर येईल. नोकरी राज्य परिवहन मंडळात नोकरी देऊ असं सरकार म्हणालं आहे. त्यामुळे ही मागणीही मान्य झाली आहे. ग्रामपंचायतीत नोंदींचे रेकॉर्ड ठेवले जाणार असून जिल्हाधिकाऱ्याने प्रत्येक सोमवारी मिटिंग घेऊन जेवढे दाखले आहेत, तेवढं अर्ज निकाली काढावे. म्हणजे ते जात समितीकडे पडून राहणार नाही. कुणबी – मराठा एकच असल्याचा अभ्यास करण्यासाठी दोन महिन्याचा अवधी मागितला आहे. सगे सोयऱ्यांचा मुद्दा निकाली काढण्यासाठी वेळ लागेल कारण त्यात लाखो हरकती आल्या आहेत, असे सरकारने स्पष्ट केले आहे. त्यामुळे मराठा समाजाच्या बहुतांश मागण्या मान्य करून घेण्यात जरांगे यशस्वी झाले आहेत.
माझी लेकरं सुखी राहतील, मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रातील मराठ्यांचं कल्याण झाल्याचे मत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त करत उपोषण सोडले आहे. त्यामुळे मराठा आंदोलक गावी परतण्यास सुरुवात झाली आहे.