
आमदार संतोष बांगर यांचे हिंगोलीत पुन्हा एकदा खळ्ळ खट्याक
हातात सत्ता असतानाही बांगराच्या हाती दंडुका, बांगरांचा सूचक इशारा
हिंगोली दि १३(प्रतिनिधी)- शेतकऱ्यांचा भरलेला विमा नाकारल्याने संतप्त झालेल्या ‘बाळासाहेबांची शिवसेनाचे आमदार संतोष बांगर आणि कार्यकर्त्यांनी हिंगोलीतील पीक विमा कार्यालयात तोडफोड केली. त्यानंतर जिल्हाधिका-यांची भेट घेत पीक विमा कंपनीला इशारा दिला आहे. त्यामुळे बांगर पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.
हिंगोली जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. पीक हातचे गेल्याने शेतकऱ्यांनी पीक विमा कंपनीकडे नुकसानीच्या तक्रारी दाखल केल्या होत्या मात्र, काही ठिकाणी अतिवृष्टी झालीच नसल्याचे सांगत विमा कंपनीने ३० हजारपेक्षा अधिक तक्रारी फेटाळून लावल्या आहेत. त्यामुळे अनेक शेतकरी मदतीपासून वंचित राहणार आहेत. हा प्रकार आमदार बांगर यांच्या कानावर आल्यानंतर त्यांनी कार्यकर्त्यांसोबत हिंगोलीतील पिकविमा कार्यालयात जाऊन तोडफोड केली आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांना अडचणीत आणण्याचे प्रकार कदापीही खपून घेतले जाणार नाहीत, असा इशाराही दिला.या तोडफोडीचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे.
शेतकऱ्यांना अडचणीत आणणाऱ्या विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांवर तातडीने गुन्हे दाखल करा. तसेच विम्याची रक्कम भरणाऱ्या सर्वच शेतकऱ्यांना पिकविम्याची रक्कम देण्याबाबत वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा करण्याच्या सुचना आमदार बांगर यांनी दिल्या आहेत. या तोडफोडीच्या काय प्रतिक्रिया येतात ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे.