आमदार शहाजी बापू पाटलांची गाडी मराठा आंदोलकांनी अडवली
मराठा आंदोलकांनी शहाजीबापूंना विचारला जाब, शहाजीबापूंनी हात जोडत मागितली माफी, व्हिडीओ तुफान व्हायरल
सांगोला दि १(प्रतिनिधी)- मनोज जरांगे पाटील यांनी सुरु केलेल्या मराठा आरक्षण आंदोलनाला राज्यभरात मोठा पाठिंबा मिळत आहे. आमदार, खासदार आणि राजकीय नेत्यांना गावबंदी देखील करण्यात आली आहे. तसेच काही नेत्यांना नागरिकांच्या रोषाचा सामना करावा लागत आहे. आता शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील यांना देखील नागरिकांच्या रोषाचा सामना करावा लागला आहे. तसेच नागरिकांचा रोष एवढा होता की, शहाजीबापूंनी तेथून काढता पाय घेतल्याचे दिसून आले.
शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील काय झाडी काय हाटील काय डोंगार यामुळे महाराष्ट्रात फेमस झाले होते. पण आता त्यांना मराठा आरक्षणामुळे नागरिकांच्या रोषाचा सामना करावा लागला. गावबंदी असताना गावात कसे आलात, अशी विचारणा करत आमदार शहाजी बापू पाटील यांची गाडी मराठा समाजाच्या तरुणांनी अडवली. यावेळी पाटील यांच्या गाडीच्या चालकानं आंदोलकांवर गाडी घालण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप देखील करण्यात आला आहे. दुपारी पंढरपूर येथील कराड नाक्यावर शिंदे गटाचे सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांची गाडी आंदोलकांनी अडवली. यावेळी पाटील यांच्या ड्रायव्हरने अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आंदोलक संदीप मांडावे यांनी केला. या प्रकारानंतर शहाजीबापू पाटील यांनी गाडीतून खाली उतरून आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मला गावबंदीची माहिती नव्हती, मी तुमच्या पाया पडतो. असे म्हणत वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. पण आंदोलक काहीही एैकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हते. यावेळी आंदोलकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. एकनाथ शिंदे यांच्याविरोधात घोषणाबाजी होत असताना शहाजीबापू फक्त उभे होते. यावेळी आमदारांच्या विरोधात घोषणाबाजी सुरु झाल्यावर शहाजीबापूंनी तेथून काढता पाय घेतला. याचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. तसंच मराठा आरक्षणाविषयी यावेळी मराठा आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली. एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर शिंदे यांच्यासोबत शहाजीबापू पाटीलदेखील होते. शहाजी पाटील हे सांगोला विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे आमदार आहेत.
राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा आता अधिक तीव्र झाला आहे. काही ठिकाणी आमदार-खासदारांची घरे पेटविण्यात आली आहेत. काही ठिकाणी दगडफेकीच्या घटना घडल्या आहेत. या सगळ्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणा आता अलर्ट झाली आहे. राज्यातील नेत्यांच्या घरांना आता पोलिस संरक्षण देण्यात आले आहे.
टीप- व्हिडिओ काही अपशब्द वापरण्यात आले आहेत. त्यामुळे व्हिडिओ स्वतः जबाबदारी वरती पहावा.