‘कोरोना काळात मोदींनी अनेक औषधांचे शोध लावले’
भाजपच्या 'या' मंत्र्याचा अजब दावा, वाद होण्याची शक्यता
मुंबई दि ३१ (प्रतिनिधी)- कोरोना काळात मोदींनी अनेक औषधांचे शोध लावले. यासाठी आपण यापूर्वी इतर देशांवर अवलंबून रहायचो, पण मोदींनी ते करुन दाखवलं. असा अजब दावा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केला आहे. यावेळी नारायण राणे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामाची जोरदार स्तुती केली.
नारायण राणे यांनी पंतप्रधानाची जोरदार स्तुती केली. राणे म्हणाले की, पंतप्रधान म्हणून मोदी उत्कृष्ट काम करत आहेत. देशात अनेक योजना त्यांनी आणल्या यामध्ये आदिवासी, मागासवर्गीय, महिलांसाठीच्या योजना असतील किंवा अनेक विकासाच्या गोष्टी त्यांनी घडवून आणल्या आहेत. कोरोनाच्या काळातही त्यांनी संकटात सापडलेल्या लोकांना वाचवण्याचं काम केलं. औषधांचे शोध लावले, इंजेक्शनचे शोध लावले, वेगवेगळे डोस देण्यात आले. आपण यापूर्वी इतर देशांवर अवलंबून रहायचो पण मोदींनी ते करुन दाखवलं. त्यामुळं मला अभिमान आहे या मंत्रिमंडळात असल्याचा. देशाला योग्य पंतप्रधान मिळालेत अतिशय चांगला कारभार ते करत आहेत. ते भारताला आत्मनिर्भर भारत बनवतील असा मला विश्वास वाटतो,” अशा शब्दांत नारायण राणे यांनी मोदींचं कौतुक केलं.पण मोदींनी कोणत्या ओैषधाचा शोध लावला हे मात्र त्यांनी सांगितले नाही.पण या दाव्यामुळे विरोधक टिका करण्याची शक्यता आहे.
यावेळी राणे यांनी ठाकरे आणि महाविकास आघाडीवर जोरदार टिका केली. महाराष्ट्रात यावर्षी गणेशाच्या आगमनापूर्वीच सत्तांतर झालं, ही गणरायाची कृपा आहे. त्यामुळं राज्यातील अडीच वर्षांपासूनच संकट टळलं आहे. अडीच वर्षात कायदा सुव्यवस्था नव्हती, विकास नव्हता. कोणत्याही क्षेत्रात उद्धव ठाकरेंच सरकार काम करु शकलं नाही. लोकांना न्याय देऊ शकलं नाही, असंही राणे पुढे म्हणाले आहेत.