Latest Marathi News
Ganesh J GIF

केरळमध्ये कोसळल्या मान्सूनच्या सरी, मान्सून केरळात दाखल

महाराष्ट्रात या तारखेला होणार मान्सुनचे आगमन, हवामान विभागाकडून या जिल्ह्यांना यलो अलर्ट

मुंबई दि ९(प्रतिनिधी)- अनेकांना ज्याची प्रतीक्षा होती तो मान्सून आता भारतात दाखल झाला आहे. केरळमध्ये मुसळधार पावसासह गुरुवारी मान्सूनचे आगमन झाल्याची औपचारिक घोषणा भारतीय हवामान विभागाने केली आहे. मागील ७ दिवस केरळपासून ४०० किमी दूर अडकलेला मान्सून गुरुवारी वेगाने वाढला आणि एकाच दिवशी केरळला पार करत कर्नाटकमध्ये दाखल झाला आहे. आता तो महाराष्ट्रात कधी येणार याची प्रतिक्षा आहे.

मान्सून दरवर्षी साधारणपणे १ जूनपर्यंत केरळमध्ये दाखल होतो. यंदा थोडा उशिरा म्हणजे ४ जूनपर्यंत मान्सूनच्या आगमनाचा अंदाज व्यक्त केला गेला होता, मात्र अरबी समुद्रात उठलेल्या ‘बिपरजॉय’ वादळामुळे मान्सूनची प्रतीक्षा लांबली आणि अंदाजापेक्षा चार दिवस आणि दरवर्षीपेक्षा सात दिवस उशिराने मान्सूनने केरळात प्रवेश केला. मान्सूनच्या पुढील वाटचालीसाठी सध्या पोषक वातावरण असून केरळच्या पुर्ण भागांत आज पाऊस पडत आहे. दक्षिण तामीळनाडूतही मान्सून दाखल झाला असून पुढच्या काही तासांत कर्नाटकचा दक्षिण भागही मान्सूनच्या सरींनी सुखावणार आहे. केरळनंतर पुढच्या साधारण आठवडाभरात मान्सून महाराष्ट्रात पोहोचतो. त्यानुसार १५ ते १६ जूनपर्यंत तळकोकणात मान्सूनचे आगमन होणे अपेक्षित आहे. मात्र, अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्टय़ामुळे राज्यात मान्सूनला थोडा विलंब होण्याची व्यक्त केली जात आहे. मान्सून १८ जूनदरम्यान मुंबईसह तळकोकणात येण्याची दाट शक्यता आहे. मुंबईत स्थिरावल्यानंतर तो सह्याद्री ओलांडत उर्वरित महाराष्ट्रात प्रवेश करणार असल्याचा अंदाज आहे. मान्सून सध्या केरळमध्ये पोहोचला असून त्याच्या प्रगतीवर लक्ष ठेवलं जात आहे. येत्या दोन-तीन दिवसांत महाराष्ट्रात मान्सूनच्या सुरुवातीबाबत माहिती मिळेल. दरम्यान १२ जूनपर्यंत मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, धुळे, जळगाव, नंदुरबार, नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार मान्सूनपूर्व पावसाचा अंदाज आहे. यादरम्यान मराठवाडा आणि विदर्भात ढगाळ वातावरणासह तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता आहे.

बिपरजॉय चक्रीवादळामुळे मान्सूनवर खूप परिणाम झाला आहे. उत्तर हिंदी महासागरात तीन आठवड्यांत निर्माण होणारे बिपरजॉय हे दुसरे चक्रीवादळ आहे. पण अलीकडे मान्सून सतत हवामान विभागाला हुलकावणी देत आहे.
अंदाज आणि प्रत्यक्ष आगमन
२०२१ ३१ मे -३ जून
२०२२ 27 मे – २९ मे
२०२३ 4 जून – ८ जून

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!