पुणे – राज्यात गुन्हेगारी सातत्याने वाढत असून हत्याकांडाच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. हत्याकांडाच्या सर्वाधिक घटना मुंबई आणि पुणे शहरात घडल्या असून ठाणे आणि नागपुरात हत्याकांडाच्या घटनांवर नियंत्रण असल्याची स्थिती आहे. मुंबईत सर्वाधिक ६८ हत्याकांड झाले असून दुसऱ्या स्थानावर पुणे (४२) आणि ठाणे शहराचा (३९) क्रमांक आहे. ही माहिती महाराष्ट्र पोलिसांच्या संकेतस्थळावरून समोर आली आहे.
वर्षाच्या सुरुवातीपासूनच राज्यात गंभीर स्वरुपाच्या गुन्ह्यात वाढ झाली होती. तसेच मुली, तरुणी आणि महिलांवरील लैंगिक अत्याचार आणि विनयभंगाच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. राज्यात हत्याकांड आणि खून करण्याचा प्रयत्न केल्याच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. गुन्हेगार आणि गुन्हेगारी वाढत असल्याने पोलीस अधिकाऱ्यांच्या कार्यप्रणालीवर संशय व्यक्त केल्या जात आहे. राज्यात गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्यात पोलीस विभागाला सातत्याने अपयश येत असल्यामुळे पिस्तूल, तलवार सारख्या शस्त्रासह वावरणाऱ्या गुन्हेगारांच्या टोळ्या सक्रिय झाल्या आहेत. राज्यात गंभीर स्वरुपाच्या गुन्ह्याची वाढती संख्या बघता गृहमंत्रालय आणि पोलीस महासंचालक कार्यालयातून हालचाली होणे गरजेचे आहे. राज्यात मुंबई आणि नवी मुंबई शहरात जून महिन्यांपर्यंत ६८ हत्याकांड घडले आहे. पुणे शहरात ४२ तर ठाणे शहरात ३९ खुनाच्या घटना घडल्या आहेत. नागपूर शहरात हत्याकांडाच्या घटनांवर सुरुवातीला नियंत्रण होते. मात्र, जून महिन्यापर्यंत ३८ चा आकडा नागपूरने गाठला आहे.
सर्वाधिक हत्याकांड मे महिन्यात
राज्यभरातील सहा महिन्यांची आकडेवारी लक्षात घेता मे महिन्यात सर्वाधिक (४२) हत्याकांड घडले आहेत. मुंबईत सर्वाधिक (१८) तर ठाण्यात (१२) खुनाच्या घटना मे महिन्यात घडल्या आहेत. तसेच पुण्यात (११) आणि नागपुरात (६) हत्याकांड घडले आहेत. तर जानेवारीतसुद्धा राज्यातील चार प्रमुख शहरांत ३६ हत्याकांडाच्या घटना घडल्या आहेत.
अनैतिक संबंधातून सर्वाधिक हत्या
राज्यातील सर्वाधिक हत्याकांड घडण्यासाठी अनैतिक संबंध, प्रेम संबंध किंवा शारीरिक संबंधाचे कारण ठरल्याचे समोर आले आहे. कौटुंबिक कारणातून घडलेल्या हत्याकांडात प्रियकर, नातेवाईक किंवा कुटुंबातील व्यक्तीचा समावेश असल्याचे धक्कादायक कारण समोर आले आहे. तसेच बऱ्याच घटनांमध्ये जुने वैमनस्य, संपत्ती आणि पैशाचा वाद असल्याचे कारण समोर आले आहे.