
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून विधान परिषदेसाठी माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांना ‘ऑफर’ देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
या राजकीय हालचालींमुळे मुंबईसह थेट अमरावतीच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. येत्या १२ मे रोजी ही विधान परिषदेची निवडणूक होत आहे.

अचलपूर मतदारसंघातून चार वेळा कडू हे आमदार म्हणून निवडून आले. शेतकरी, दिव्यांगांच्या प्रश्नांवरून त्यांची आंदोलने राज्यभरात गाजली. नागपुरातील शेतकरी आंदोलनाचा परिणाम म्हणून सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर केली. ही कर्जमाफी व्हावी म्हणून अलीकडेच त्यांनी मेळघाटात ११ दिवस शेतकरी संघर्ष यात्रा काढली होती. या प्रत्येक वेळी एकनाथ शिंदे यांनी कडू यांच्याशी संवाद साधला.

कर्जमाफीचे संपूर्ण श्रेयही त्यांनी जाहीररित्या कडू यांना दिले होते. आता थेट पक्षाकडून विधान परिषदेची ऑफर देण्यात आली आहे. विधान परिषदेच्या माध्यमातून ‘प्रहार’चा आवाज थेट मुंबईच्या पटलावर पोहोचणार की कडू पुन्हा एकदा प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधात आपला स्वतंत्र बाणा दाखवणार, याकडे अमरावती जिल्ह्यासह राज्याचे लक्ष लागले आहे.


