राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचा आमदारकीचा राजीनामा?
ट्विटमुळे खळबळ, सत्ताधारी विरोधक आमनेसामने, बघा प्रकरण काय?
मुंबई दि १३(प्रतिनिधी) – राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आपण आपल्या आमदारकीचा राजीनामा देत असल्याची घोषणा केली आहे. माझ्याविरुद्ध पोलिसी अत्याचार सुरु असल्याचा दावा करत आव्हाड यांनी ही घोषणा केली आहे. ‘पोलिसांनी माझ्याविरुद्ध ७२ तासात दुसरा खोटा गुन्हा दाखल केला आहे. यामुळे आपण राजीनामा देणार असल्याची घोषणा आव्हाड यांनी केली आहे. यावरून राज्यात सत्ताधारी विरोधक आमनेसामने आले आहेत.
पोलीसांनी माझ्या विरुद्ध ७२ तासात २ खोटा गुन्हा दाखल केला आणि तोही 😭३५४ ,.,
मी ह्या पोलिसी आत्याचारा विरुद्ध लढणार … मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतो आहे,,. लोकशाहीची हत्या .. उघड्या डोळ्यांनी नाही बघू शकत— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) November 14, 2022
‘हर हर महादेव’ या मराठी चित्रपटात इतिहासाची तोडमोड केल्याचा दावा करत जितेंद्र आव्हाड यांनी काही दिवसांपूर्वी ठाण्यात या चित्रपटाचा शो बंद पाडला होता. त्यानंतर त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करत अटकेची कारवाईही करण्यात आली होती. यात त्यांना जामीनही मिळाला होता. त्यानंतर मुख्यमंत्री उपस्थित असलेल्या कार्यक्रमात जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे त्यांनी थेट विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. ‘मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतो आहे. लोकशाहीची हत्या होत असताना मी उघड्या डोळ्यांनी बघू शकत नाही,’ असे ट्विट आव्हाड यांनी केले आहे. यानंतर सत्ताधारी विरोधक आमनेसामने आले आहेत. सत्ताधारी सत्तेचा गैरवापर करत असल्याचा आरोप विरोधक करत आहेत तर सत्ताधारी आव्हाड दबावाचे राजकारण केत असल्याचा आरोप केला आहे.
ठाण्यात एका कार्यक्रमात मुख्यमंत्री आले होते आव्हाडही त्यावेळी तिथे होते. यावेळी काही महिला मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी आल्या होत्या. त्यावेळी आव्हाड त्यांना बाजूला करत पुढे गेले. पण महिलेने आव्हाड यांनी जाणीवपूर्वक मला अपमानित करण्यासाठी दोन्ही खांद्याला धरुन ‘काय मध्ये उभी आहे, चल बाजूला हो’ असे म्हणत ढकलल्याचा आरोप करत विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.