वाढत्या महागाईविरोधात राष्ट्रवादीचा जन आक्रोश
सुप्रिया सुळे यांची केंद्र सरकारच्या धोरणावर जोरदार टिका
पुणे दि २९ (प्रतिनिधी) – “भाजीपाल्यापासुन औषधांपर्यंत सगळीकडेच महागाई वाढली आहे. या महागाईतून देशातील जनतेला बाहेर काढण्यासाठी केंद्र सरकारने विशेष प्रयत्न केले पाहिजेत. मात्र हे सरकार कोणतेही प्रयत्न करताना दिसत नाही. त्यामुळे जनतेचा आक्रोश आम्ही आंदोलनातून सरकारला दाखवून देत आहोत, असे राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. पुण्यात सुळे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने वाढत्या महागाईविरोधात जनआक्रोश आंदोलन करण्यात आले. यावेळी त्यांनी केंद्र सरकारसह राज्य सरकारच्या धोरणावर टिका केली आहे.
जनआक्रोश आंदोलनात केंद्र सरकार आणि राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी मार्गदर्शन करताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, ”मी पावसाळी अधिवेशनात संसदेत महागाईवर बोलताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना महागाई कमी करण्यासाठी सरकारने पावले उचलावीत अशी विनंती केली होती. पण त्यांनी कोणतीही कृती न केल्याने महागाई प्रचंड वाढली आहे. पेट्रोलवतील ५ रूपये कमी करून काहीही होणार नाही. जीवनावश्यक वस्तूंवर जीएसटी लावल्यामुळे महागाई वाढतच चालली आहे. म्हणून महागाईच्या विरोधात आम्ही आंदोलन करुन या सरकारला जागे करण्यासाठी अखेरपर्यंत आंदोलन करीत राहणार आहोत.” असे सांगतानाच, त्यांनी केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेल, सीएनजीसह घरगुती गॅसच्या दरात केलेली वाढ आणि घरगुती वापराच्या वस्तूंवर लादलेल्या जीएसटी धोरणावर जोरदार टिका केली आहे.
पुण्यातील चांदणी चोैकातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी प्रशासनाकडून पूल पाडण्याचे नियोजन केले आहे. या विषयावर बोलताना सुळे यांनी पूल पाडण्या अगोदर पर्यायी रस्ता उपलब्ध करून द्यावा तसेच पूल पाडल्यानंतर कोणतीही समस्या निर्माण होणार नाही यासाठी सर्वांशी चर्चा करुन योग्य नियोजन करावे असे आवाहन केले आहे.