Latest Marathi News
Ganesh J GIF

MPSC पेपरफुटी प्रकरणात नवा ट्विस्ट!; मंत्री नरहरी झिरवाळ यांचं कार्यालय पुन्हा वादाच्या भोवऱ्यात

राज्याच्या अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागातील ‘औषध निरीक्षक’ (Drug Inspector) भरती परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणात दररोज नवनवे खुलासे होत आहेत. आता या प्रकरणात एक मोठा आणि विचित्र योगायोग समोर आला असून, अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांचे कार्यालय पुन्हा एकदा चर्चेच्या आणि वादाच्या केंद्रस्थानी आले आहे. पेपरफुटी प्रकरणातील मुख्य आरोपीच्या नंदुरबार येथील घरात मंत्री झिरवाळ यांचे विशेष कार्य अधिकारी (OSD) गणेश देवरे हे भाडेकरू म्हणून राहत असल्याचे उघडकीस आले आहे. विशेष म्हणजे, हे प्रकरण समोर आल्यापासून देवरे हे मंत्री कार्यालयात फिरकलेलेच नाहीत.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (MPSC) २२ मार्च रोजी औषध निरीक्षक गट-ब पदासाठी चाळणी परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेचा निकाल लागून २२ जुलै रोजी पात्र ४८८ उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली. मात्र, परीक्षेचे प्रश्न आधीच फुटल्याचे काही उमेदवारांनी MPSC ला ईमेलद्वारे कळवले. त्यानंतर २७ जुलै रोजी आयोगाने पोलिसांत गुन्हा दाखल केला. सध्या मुंबई गुन्हे अन्वेषण शाखा (Crime Branch) या प्रकरणाचा सखोल तपास करत आहे.

आतापर्यंत ७ जणांना अटक

या हाय-प्रोफाइल पेपरफुटी प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत ७ जणांना बेड्या ठोकल्या आहेत. यात MPSC चे ३ कर्मचारी,नंदुरबारच्या कौटिल्य अकादमीचा प्रवीण पाटील, परीक्षार्थी ऋतुजा पाटील आणि गौरव पाटील यांचा समावेश आहे. आयोगाने ही संपूर्ण भरती प्रक्रिया आधीच रद्द केली आहे.

आरोपीच्या घरात मंत्री महाशयांच्या OSD चे बिऱ्हाड!

तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या गौरव पाटील या आरोपीच्या नंदुरबार येथील घरात मंत्री नरहरी झिरवाळ यांचे OSD गणेश देवरे भाडेकरू म्हणून राहत आहेत.जरी MPSC च्या परीक्षा आणि मंत्री कार्यालयाचा थेट संबंध नसला, तरी ज्या अन्न व औषध प्रशासन विभागाची ही परीक्षा होती, त्याच विभागाच्या मंत्र्यांचे अधिकारी आरोपीच्या संपर्कात आणि घरात राहत असल्याने संशयाची सुई अधिक गडद झाली आहे. गणेश देवरे यांची मूळ आस्थापना कृषी विभाग असून, झिरवाळ विधानसभा उपाध्यक्ष असल्यापासून ते त्यांच्यासोबत कार्यरत आहेत.

झिरवाळ यांचे कार्यालय पुन्हा ‘स्कॅनर’वर

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे मंत्री नरहरी झिरवाळ यांचे कार्यालय वादात सापडण्याची ही पहिलीच वेळ नाही.झिरवाळ यांच्या कार्यालयातील एका लिपिकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) लाच घेताना रंगेहाथ अटक केली होती.MPSC पेपरफुटीतील आरोपींशी OSD चा थेट संबंध जोडला गेल्याने प्रशासकीय आणि राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. पोलीस आता या प्रकरणात गणेश देवरे यांची काय भूमिका आहे आणि या पेपरफुटीचे धागेडोरे आणखी कुठे पोहोचले आहेत, याचा तांत्रिक तपास करत आहेत.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!