Latest Marathi News
Ganesh J GIF

‘कुणी कितीही अडविले तरी लोकसभेची निवडणूक लढवणारच’

मंगलदास बांदलांचा निर्धार, कोल्हेंच्या अडचणी वाढणार शिरूर लोकसभेची समीकरणे बदलणार

पुणे दि २७(प्रतिनिधी)- पुणे जिल्हा परिषदेचे आरोग्य आणि बांधकाम विभागाचे माजी सभापती मंगलदास बांदल यांना दीड वर्षानंतर जामीन मंजूर झाल्यानंतर ते बाहेर आले आहेत.पण त्यांच्या तुरुंगाबाहेर येण्याने शिरूर हवेलीची राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. कारण बाहेर येताच त्यांनी मोठी राजकीय घोषणा केल्याने रंगत वाढली आहे.

बांदल हे शरद पवार यांचे निकटवर्तीय असल्याने त्यांनी राष्ट्रवादीतूनच आपली राजकीय सुरुवात केली होती. शिरुरच्या राजकारणात त्यांची भूमिका नेहमीच महत्वाची राहिलेली आहे.आता जामिनावर बाहेर येताच त्यांनी आपल्या आगामी राजकीय वाटचालीची घोषणा केली आहे. पत्रकार परिषद घेत त्यांनी आपली भूमिका मांडली आहे ते म्हणाले, “कुणी कितीही अडविले तर लोकसभेची निवडणूक लढवणारच, आगामी सर्व निवडणुका सर्वसामान्य कार्यकर्त्यांना सोबत घेऊन लढविणार आहे, सध्याची राज्यातील राजकीय स्थिती गोंधळाची आहे, त्यामुळे आगीतून उठून फुफाट्यात पडायचे जाणीवपूर्वक टाळत आहे. असे सांगत आपली जेलवारी राजकीय प्रेरीतच होती असा दावा बांदल यांनी केला आहे. दरम्यान बांदल यांच्यावर २६ एप्रिल २०२१ रोजी शिक्रापूर येथील सोसायटीचे माजी अध्यक्ष दत्तात्रय मांढरे यांच्या तक्रारीवरून फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. त्यावेळी त्यांना अटक झाली होती पण तब्बल २१ महिन्यानंतर ते बाहेर आले आहेत. सध्या बांदल समर्थकांमध्ये आनंदाचे वातावरण असून बांदल यांनी ‘राजकीय हिसाब तो जरूर पुरा करेंगे,’ असे म्हणत विरोधकांना सुचक इशारा दिला आहे.

बांदल यांनी खासदार अमोल कोल्हे यांच्यावर टिका केली आहे. आढळराव विरोधक असून सगळे विसरून भेटायला आले. फोनवरून खुशाली विचारली. पण ज्यांच्यासाठी केले ते मात्र विसरले, असे म्हणत त्यांनी कोल्हेंवर निशाना साधला. त्यामुळे आता कोल्हे आणि पर्यायाने राष्ट्रवादीसमोरच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. पण बांदल राजकारणात सक्रिय झाल्याने शिरूर लोकसभेची गणिते आणि समीकरणे निश्चित बदलणार आहेत.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!