
पुणे दि १(प्रतिनिधी)- जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्य, इंधन दरवाढीमुळे सामान्य होरपळलेले असतानाच आता खाद्यतेलाच्या दरात मागील महिन्याभरात मोठी घट झाली. खाद्यतेलांच्या १५ किलोच्या डब्यामागे २०० ते ३०० रुपयांनी घट झाली आहे. किरकोळ बाजारात एक किलो तेलाच्या पिशवीमागे २० ते ३० रुपयांनी घट झाल्याने सामान्यांना दिलासा मिळाला आहे. त्यामुळे श्रावण महिन्यात श्रावणसरींचा आनंद घेत चमचमीत तळलेले पदार्थ खाण्यास आता कोणतीही अडचण असणार नाही.
फेब्रुवारी महिन्यापासून खाद्यतेलाच्या दरात टप्प्यप्प्प्याने वाढ होत गेली.सुरुवातीला रशिया-युक्रेनमधील युद्धामुळे सूर्यफूल तेलाची आवक कमी झाली. त्यानंतर इंडोनेशिया, मलेशियात पामतेलाचे उत्पादन कमी झाल्याने तेथील स्थानिक बाजारात पामतेलाचा तुटवडा जाणवू लागला. त्यामुळे त्या देशांनी पामतेल निर्यातीवर निर्बंध घातली होती. त्याचाच परिणाम म्हणून भारतात तेलाचे दर उच्चांकी पातळीवर पोहोचले होते. दक्षिण अमेरिकेतील देशांतील हवामान बदलामुळे सोयाबीनची लागवड कमी झाल्याने भारतात सोयाबीन तेलाचा पुरवठा कमी प्रमाणावर होत होता. या जागतिक घडामोडींमुळे पामतेल, सोयाबीन तेल, सूर्यफूल तेलाच्या दरात मोठी वाढ झाली होती.पण मागील महिनाभरापासून खाद्यतेलांचा पुरवठा सुरळीत झाल्यानंतर सूर्यफूल, सोयाबीन, पामतेलाच्या दरात घट झाली आहे. शेंगदाणा तेलाचे दर मात्र टिकून आहेत.
तेलाचे दर वाढल्यामुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले होते. त्यामुळे आधीच महागाई होरपळेल्या जनसामान्यांना मोठा फटका बसत होता. पण आता तेलाचे दर कमी झाल्यामुळे नागरिकांना थोडासा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे श्रावण मासी चमचमीत तळलेल्या पदार्थ करण्यास कोणतीही आडकाठी नसणार आहे.