आता भाजपाकडूनही शिंदे गटाचा गद्दार असा उल्लेख
भाजपाच्या समर्थनार्थ ती पोस्ट व्हायरल, महायुतीत महातणाव, जागावाटपावेळी वाद रंगणार?
नाशिक दि ५(प्रतिनिधी)- एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केल्यापासून शिंदे गटाला महाविकास आघाडी खासकरुन ठाकरे गटाकडून गद्दार म्हणून संबोधण्यात आले. आता शिंदे फडणवीस सरकारला एक वर्ष होत आल्यानंतर दोघांमधील वाद समोर आले आहेत. पण आता भाजपाकडुन शिंदे गटातील खासदाराला गद्दार म्हणून संबोधण्यात आल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांचा भाजपच्या वतीने गद्दार असा उल्लेख करणारी पोस्ट व्हायरल होत आहे. नाशिकमधुन भाजपाकडुन लोकसभेसाठी इच्छुक असलेले दिनकर पाटील यांच्या समर्थनार्थ ही पोस्ट करण्यात आली आहे. नाशिक महापालिकेचे माजी सभागृह नेते व ज्येष्ठ नगरसेवक दिनकर पाटील दोन वर्षांपासून लोकसभा निवडणुकीची तयारी करत आहेत. इगतपुरी, सिन्नर, त्र्यंबकेश्वर, नाशिक शहर या भागात त्यांनी आपला जनसंपर्क वाढवला आहे. पण आता शिवसेना भाजप युती झाल्याने पाटील यांची अडचण झाली आहे. त्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांनी पाटील यांच्या कामांची माहिती देताना खासदार गोडसे यांच्याविरोधात पोस्ट व्हायरल केले जात आहेत. पाटलांच्या कार्यकर्त्यांनी खासदार गोडसे हे ‘गद्दार’ असल्याचा थेट आरोप केला आहे. यावेळी एक कविता व्हायरल होत आहे. त्यात गोडसे यांना अप्रत्यक्षपणे भ्रष्टाचारी, गद्दार, थापाडे अशी शेलकी विशेषणे लावली आहेत.भाजपाकडुन गद्दार असा उल्लेख झाल्यानंतर शिंदे गटाकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. गोडसे यांच्या एककल्ली कारभारावर शिवसेनेतील पदाधिकारीही नाराज असल्याची चर्चा आहे. पण यावरून शिंदे गट आणि भाजपात कलगीतुरा रंगण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
वरिष्ठांच्या आदेशानुसार मी दोन वर्षांपासून लोकसभेची तयारी करत आहे. खासदार गोडसे यांच्याबाबत व्हायरल केलेल्या पोस्टचा काहीही संबंध नाही. मी भाजपचा एकनिष्ठ कार्यकर्ता आहे. त्यामुळे पक्ष व वरिष्ठ जे निर्णय घेतील तो मान्य असेल असे राजकीय उत्तर पाटील यांनी दिले आहे. त्यामुळे आगामी काळात नाशिकच्या जागेवरून वाद होण्याची शक्यता आहे.