‘आमचं भाजपाच सरकार आहे, दादागिरी चालणार नाही’
भाजपाचा मनसे नेते अमित ठाकरेंना इशारा, अमित ठाकरे खोटारडे असल्याचा आरोप, राजकारण तापणार?
मुंबई दि २५(प्रतिनिधी)- मनसे आणि भाजप यांच्यात वाढत असलेली जवळीक पुन्हा एकदा वादात बदलली आहे. अजित पवार सत्तेत आल्यापासून राज ठाकरे यांनी भाजपावर टिका केली होती. पण आता भाजपाने मनसे आणि अमित ठाकरे यांना टोलफोड प्रकरणी थेट इशारा दिल्याने मनसे आणि भाजपा यांच्यात आगामी काळात संघर्ष होण्याची शक्यता आहे. टोलफोडीचे पडसाद महाराष्ट्रातील राजकारणात उमटू लागले आहेत.
समृद्धी महामार्गावरील टोलनाक्यावर मनसे नेते अमित ठाकरे यांचे वाहन काही काळ थांबविण्यात आले. या प्रकारामुळे संतापलेल्या मनसैनिकांनी टोलनाक्याची तोडफोड केली होती. त्यानंतर अमित ठाकरे यांनी देखील त्या टोलफोडीचे समर्थन केले होते. पण या प्रकरणानंतर भाजपाने मनसेचे टिका केली आहे. भाजपा महाराष्ट्रच्या ट्विटर हँडलवरून एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. यामध्ये अमित ठाकरे यांना लक्ष्य करण्यात आले आहे. टोल फोडणे म्हणजे राजकारण नाही. कधीतरी बांधायला शिका आणि शिकवा असा सल्ला देत आमचं सरकार दादागिरी चालू देणार नाही, असा इशाराही भाजपने दिला आहे. व्हिडिओमध्ये भाजपाने अमित ठाकरे चुकीचे वागले असे सांगितले आहे. अमित ठाकरे खोट बोलतायत, त्यांनी मनसे कार्यकर्त्यांना टोल नाका फोडायला भाग पाडलं, फास्ट टॅगची समस्या असल्यामुळे अमित ठाकरे यांची गाडी फक्त तीन ते साडेतीन मिनिटं थांबवली असं भाजपाच म्हणणं आहे. तसेच सरकार जनसामान्यांचं सरकार आहे. कोणा एकासाठी किंवा त्यांच्या मुलांसाठी वेगळे नियम पाळले जाणार नाहीत, असे या व्हिडीओत भाजपने अमित ठाकरे यांना सुनावले आहे. तसेच काल शिंदे गटाने देखील अमित ठाकरे यांच्यावर टिका केली होती. समृद्धी महामार्ग हा देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांचा ड्रीम प्रोजेक्ट राहिला आहे. आणि मनसेने नेमक्या याच मार्गावरील टोलनाक्यावर तोडफोड केल्याने भाजपा चांगलीच आक्रमक झाली आहे.
अमीत ठाकरे टोल नाका फोडणे म्हणजे राजकारण नाही. कधीतरी बांधायलाही शिका आणि शिकवा.#Tollnaka #BJPMaharashtra #BJPGovt pic.twitter.com/BBRfDT9rlP
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) July 24, 2023
महाराष्ट्र भाजपाच्या या टीकेला आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले आहे. “ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्यांचे पक्ष फोडले, ते आम्हाला बांधण्याबद्दल काय शिकवावणार?. त्यांनी दुसऱ्यांचे पक्ष फोडण्यापेक्षा स्वत:चा पक्ष बांधावा” असं संदीप देशपांडे यांनी म्हटलं आहे. आगामी काळात मनसे आणि भाजपातील वाद वाढण्याची शक्यता आहे.