
पिंपरी-चिंचवडकरांचा प्रवास होणार हायटेक!; शहरात धावणार अत्याधुनिक ‘ई-आरटीएस’; सीएम फडणवीसांचे मोठे निर्देश
पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतूक व्यवस्था अधिक आधुनिक, जलद आणि पर्यावरणपूरक करण्यासाठी राज्य सरकारने एक अत्यंत महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. शहरात ई-आरटीएस (Electric Rapid Transit System) या अत्याधुनिक सार्वजनिक वाहतूक प्रकल्पाच्या अंमलबजावणीला गती देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. मुंबईत झालेल्या एका उच्चस्तरीय बैठकीत पिंपरी-चिंचवड महापालिकेचे (PCMC) आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी या प्रकल्पाची संकल्पना सादर केली. महामेट्रोच्या सहकार्याने हा प्रायोगिक प्रकल्प पुढील दीड वर्षात सुरू करण्याचे नियोजन आहे.

नेमकी काय आहे ही ‘ई-आरटीएस’ प्रणाली?

ई-आरटीएस ही प्रणाली हुबेहूब मेट्रोप्रमाणेच वेगवान, सुरक्षित आणि आरामदायी प्रवासाचा अनुभव देणारी असेल. या प्रकल्पात रुळांऐवजी रबर टायरवर धावणारी पूर्णपणे इलेक्ट्रिक वाहने (Electric Vehicles) वापरली जातील. या यंत्रणेतील एका वाहनात एकाच वेळी २४० हून अधिक प्रवासी प्रवास करू शकतील.यामुळे शहरातील प्रमुख मार्गांवरील प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणावर वाचणार आहे.

पहिल्या टप्प्यात ‘या’ १७ किलोमीटर मार्गावर धावणार!
ई-आरटीएसचा पहिला प्रायोगिक मार्ग १७ किलोमीटर लांबीचा असेल. हा मार्ग शहरातील खालील प्रमुख चौकांना जोडेल:
राजा शिवछत्रपती चौक (गोडाऊन चौक) ➡️ कुदळवाडी चौक ➡️ केएसबी चौक ➡️ ऑटो क्लस्टर ➡️ एम्पायर इस्टेट ➡️ काळेवाडी फाटा ➡️ जगताप डेअरी चौक ➡️ वाकड.
हा मार्ग पुणे-नाशिक महामार्ग, मुंबई-पुणे एक्सप्रेसवे, मुंबई-बंगळूर महामार्ग आणि मेट्रो मार्गांशी जोडला जाणार आहे. त्यामुळे प्रवाशांना एका वाहनातून दुसऱ्या वाहनात सहज बदल करता येईल.
यशस्वी झाल्यानंतर संपूर्ण शहरात विस्तार!
महापालिकेच्या नियोजनानुसार, हा १७ किमीचा प्रायोगिक प्रकल्प यशस्वी झाल्यानंतर शहरातील एचसीएमटीआर (HCMTR) आणि सर्व बीआरटी (BRT) मार्गांवर ई-आरटीएसचा टप्प्याटप्प्याने विस्तार केला जाईल. तसेच, शहरातील सर्व मेट्रो स्थानके आणि रेल्वे स्थानके या प्रणालीने एकमेकांना जोडली जातील.
पिंपरी-चिंचवडकरांना नेमका काय फायदा होणार?
शहरातील मुख्य रस्त्यांवरील वाहतूक कोंडी (Traffic) मोठ्या प्रमाणात कमी होईल.
इलेक्ट्रिक वाहनांमुळे शहरातील वायू आणि ध्वनी प्रदूषणात लक्षणीय घट होईल.
मेट्रो, बीआरटी आणि रेल्वेची प्रभावी जोडणी झाल्याने प्रवासाचा वेळ वाचेल.
पर्यावरणपूरक आणि खिशाला परवडणारी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उपलब्ध होईल.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संकल्पनेचे कौतुक करत, प्रकल्पाचे काम कोणताही विलंब न करता वेळेत पूर्ण करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. शहराला स्मार्ट आणि शाश्वत वाहतूक व्यवस्था देण्याच्या दृष्टीने हा प्रकल्प गेमचेंजर ठरणार आहे.

