लोणी काळभोरमध्ये पोलिसांची नागरिक लहान मुलांना मारहाण
संतापजनक घटनेचा व्हिडिओ व्हायरल, मुलांना मारहाण करत महिलांना शिवीगाळ केल्याचा आरोप
पुणे दि १७(प्रतिनिधी)- पुण्याजवळील लोणी का़ळभोरमध्ये पोलीसांनी नागरिकांना बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. अल्पवयीन मुलांना आणि नागरिकांना पोलिसांनी बेदम मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.त्यामुळे पोलीसांच्या या वर्तवणूकीवर संताप व्यक्त होत आहे. मंगळवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली आहे.
लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीतील भोसले चाळीत संतोष भोसले यांच्या वाढदिवस साजरा केला जात होता. या कार्यक्रमासाठी अल्पवयीन मुले तसेच महिलाही हजर होत्या.त्याचवेळी पोलीस उपनिरीक्षक वैभव मोरे आणि त्यांचे चार सहकारी पोलिसांच्या वाहनातून घटनास्थळी आले.त्यांनी नागरिकांना आणि लहान मुलांना थेट मारहाण करण्यास सुरूवात केली. यावेळी महिलांना देखील शिविगाळ केली. संतोष भोसले आणि त्यांच्या घरातील नातेवाईकांनी पोलिसांना हा सर्व प्रकार थांबवण्याची विनंती केली, असता त्यांना देखील पोलीसांनी शिवीगाळ केली आहे. काहीजण हा प्रकार मोबाईल मध्ये शुट करत आहेत लक्षात आल्यानंतर पोलिसांनी मोबाईल देखील जप्त करुन मोबाईलमधील व्हिडिओ डिलिट केले. यावेळी स्थानिक नागरिकांनी मध्यस्थी करत या प्रकारावर पडदा टाकला. पण या घडलेल्या प्रकारामुळे संतप्त नागरिकांनी संतोष भोसले यांनी वैभव मोरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या विरोधात कारवाई करण्याबाबत लेखी अर्ज देत लवकर कार्यवाही करण्याची विनंती केली आहे.

या मारहाणीचा व्हिडिओ देखील समोर आला आहे. पोलीस उपनिरीक्षक वैभव मोरे आणि त्यांच्या सहकारी पोलिसांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे पदाधिकारी संतोष भोसले आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केली आहे.