लोणी काळभोरचे पोलीस उपनिरिक्षक वैभव मोरेवर उगारला कारवाईचा बडगा
अल्पवयीन मुले आणि नागरिकांना मारहाण करणाऱ्या मोरेंच्या अडचणीत वाढ, ठिय्या आंदोलन मागे
पुणे दि २०(प्रतिनिधी)- लोणी काळभोरमध्ये संतोष भोसले यांच्या वाढदिवसा दिवशी लहान मुले आणि महिलांना मारहाण आणि शिविगाळ करणारे पोलीस उपनिरिक्षक वैभव मोरे आणि इतर दोन सहका-यांवर अखेर कारवाईचा बडगा उचलण्यात आला असून, त्या तिघांची थेट मुख्यालयात बदली करण्यात आली आहे. तसेच त्यांची खातेनिहाय चाैकशी देखील होणार आहे.
लोणी काळभोरमध्ये १६ मेला ठाकरे गटाचे पदाधिकारी संतोष भोसले यांचा वाढदिवस असल्याने चाळीतील नागरिक घरासमोरील रस्त्यावर वाढदिवसाचा केक कापत होते. या कार्यक्रमासाठी अल्पवयीन मुले आणि महिलाही हजर होत्या. त्यावेळी अचानक पोलीस उपनिरीक्षक वैभव मोरे आणि त्यांचे सहकारी पोलिसांच्या वाहनातून घटनास्थळी आले. आणि त्यांनी थेट नागरिकांना आणि मुलांना मारहाण सुरु केली. पोलिसांनी मुलांना मारहाण करु नये यासाठी काही महिलांनी पोलिसांना थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, वैभव मोरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी महिलांना देखील शिवीगाळ केली. भोसले पोलिसांना नागरिक या ठिकाणी का जमले आहेत. हे सांगत असतानाही मोरे आणि सहकाऱ्यांनी आपली दादागिरी कायम ठेवत बेदम मारहाण केली होती. या घटनेचा व्हिडीओ देखील सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल झाला होता. त्यानंतर भोसले यांनी लोणी काळभोर पोलिसांना एक निवेदन देत कारवाईची मागणी केली होती अखेर घटनेच्या चार दिवसानंतर पोलीस विभागाने कारवाईचा बडगा उगारत पोलीस उपनिरिक्षक वैभव मोरे आणि दोन सहकाऱ्यांची थेट मुख्यालयात बदली करण्यात आली आहे. तसेच तिघांची खातेनिहाय चाैकशी केली जाणार आहे. याची माहिती भोसले यांनी देखील देण्यात आली आहे. या कारवाई बद्दल बोलताना लोणी काळभोर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक दत्तात्रय चव्हाण यांनी “पोलीस अथवा नागरिक कोणीही चुकीचे वागल्यास कारवाई होणारच आहे. भोसले चाळीत घडलेला प्रकार चुकीचा असल्याने पोलीस उपनिरिक्षक वैभव मोरे, पोलीस कर्मचारी संतोष राठोड, आणि संभाजी देवीकर यांच्यावार बदली बरोबरच चाैकशी करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.
संतोष भोसले यांनी पोलिसांना निवेदन देताना मोरे आणि दोन कर्मचाऱ्यांवर लवकर कार्यवाही न झाल्यास रविवारी ठिय्या आंदोलनाचा इशारा दिला होता. त्याचबरोबर गाव बंदचा देखील इशारा देण्यात आला होता पण आता मोरे आणि इतर कर्मचाऱ्यांवर जी कारवाई करण्यात आली आहे. त्यावर समाधान व्यक्त करत रविवारचे आंदोलन मागे घेण्यात आल्याचे ठाकरे गटाचे पदाधिकारी संतोष भोसले यांनी सांगितले आहे. तसे पत्रही लोणी काळभोर पोलिसांना दिले आहे.