
‘मागच्या जन्मात पंतप्रधान मोदी छत्रपती शिवाजी महाराज होते’
भाजपा खासदाराचे वादग्रस्त वक्तव्य, संसदेत गदारोळ, महाराष्ट्रातील वातावरण पुन्हा तापणार?
दिल्ली – भाजप खासदार प्रदीप पुरोहित यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या विधानामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. भाजपा खासदारांच्या या वक्तव्यामुळे वाद पेटण्याची शक्यता आहे.
लोकसभेत बोलताना भाजप खासदार प्रदीप पुरोहित म्हणाले, की ते एका साधूला भेटले होते. त्या साधूने त्यांना सांगितलं की पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गेल्या जन्मी छत्रपती शिवाजी महाराज होते. पंतप्रधान मोदी हे खरे तर छत्रपती शिवाजी महाराज आहेत, ज्यांनी महाराष्ट्रासह संपूर्ण देशाला विकास आणि प्रगतीकडे नेण्यासाठी पुनर्जन्म घेतला आहे. प्रदीप पुरोहित यांच्या या विधानाला काँग्रेससह विरोधी पक्षातील अनेक सदस्यांनी विरोध केला आहे. त्यानंतर रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी या वक्तव्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर सभागृहाच्या कामकाजातून ते काढून टाकण्याचा विचार करावा, अशी विनंतीही केली. तर, दिलीप सैकिया यांनी प्रदीप पुरोहित यांच्या वक्तव्याची चौकशी करून ते सभागृहाच्या कामकाजातून काढून टाकण्याची कार्यवाही करावी, असे निर्देश दिले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत प्रशांत कोरटकर आणि राहुल सोलापूरकर यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे मागील काही दिवसांपासून राज्यातील राजकारण तापलं आहे. त्यातच आता पुरोहित यांच्यामुळे त्यात भर पडण्याची शक्यता आहे. पुरोहित हे ओडिशातील बारगडचे खासदार आहेत.
महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज आणि औरंगजेब यांच्यावरून एकीकडे गोंधळ सुरू आहे. त्यात दुसरीकडे आता एका भाजप खासदाराने शिवाजी महाराजांबद्दल असे विधान केले की त्यावरून नवा वाद सुरू झाला आहे.