Just another WordPress site

पुण्याचे खासदार गिरिश बापट यांचे निधन

वयाच्या ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सर्वसमावेशक नेत्याच्या झझांवाताची अखेर

पुणे दि २९(प्रतिनिधी)- भाजपाचे पुण्यातील खासदार गिरीश बापट यांचं निधन झालं आहे. ते ७२ वर्षांचे होते. प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांच्यावर पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, त्यांची प्राणज्योत मालवल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्यावर संध्याकाळी सात वाजता वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जाणार आहे, अशी माहिती जगदीश मुळीक यांनी दिली आहे. त्यांच्या जाण्याने लोकांशी घट्ट असणा-या नेत्याचा अंत झाला आहे.

GIF Advt

गेल्या काही दिवसांपासून गिरीश बापट हे आजारी होते. कालपासून त्यांची प्रकृती आणखी खालावली होती. त्यानंतर त्यांना दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील ICU मध्ये दाखल करण्यात आले होते. गिरीश बापट हे भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांपैकी एक होते. गेल्या अनेक वर्षे पुण्यातील राजकारणात त्यांचा दबदबा होता. नुकत्याच झालेल्या कसबा पेठ पोटनिवडणुकीत भाजप पक्ष अडचणीत सापडला असताना गिरीश बापट यांनी आजारपणातही कार्यकर्त्यांच्या मेळावा घेत त्यांना बळ देण्याचा प्रयत्न केला होता. या मेळाव्याला त्यांच्या नाकात नळी आणि सोबत ऑक्सिजन सिलेंडर होता. गिरिश बापट यांनी पुण्यातील महापालिका ते दिल्लीतील संसद असा मोठा राजकीय पल्ला गाठत असताना त्यांनी गेली पाच दशके पुण्यातील राजकीय-सामाजिक कामात त्यांनी स्वतःचा मोठा ठसा उमठवला होता.१९९५ मध्ये त्यांनी पहिल्यांदा आमदारकीची निवडणूक लढविली अन्‌ निवडून आले. पुण्यातील कसबा मतदारसंघातून निवडून आल्यानंतर पुढे सलग २०१४ पर्यंत ते पाच वेळा आमदार म्हणून निवडून आले होते तर २०१९ साली ते खासदार म्हणून विजयी झाले होते. विशेष म्हणजे १९८३ मध्ये आपल्या सर्वपक्षीय जनसंपर्काच्या जोरावर गिरीश बापट महापालिकेत पक्षाची सत्ता नसतानाही स्थायी समितीचे अध्यक्ष झाले होते.

गिरीश बापट यांचा जन्म ३ सप्टेंबर १९५० रोजी पुण्यात झाला. तळेगाव दाभाडेमधून प्राथमिक शिक्षण झाल्यावर त्यांचे माध्यमिक शिक्षण न्यू इंग्लिश स्कूल रमणबागेत झाले. बीएमसीसीत वाणिज्य शाखेची पदवी घेतल्यावर बापट १९७३ मध्ये टेल्कोमध्ये कामगार म्हणून रुजू झाले. दरम्यान खासदार बापट यांच्या  निधनानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दु:ख व्यक्त केले आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!