न्यायालयाच्या आदेशानंतरही पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जन्मस्थळाचे काम स्थगित
विकास कामे सुरु करण्यासाठी रोहित पवार यांचा पाठपुरावा, मंगलप्रताप लोढांची भेट
कर्जत दि २७(प्रतिनिधी)-कर्जत -जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी नुकतीच मुंबईत महाराष्ट्र राज्याचे पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा यांची भेट घेतली आहे. सध्या पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांचे जन्मस्थळ असलेल्या चौंडी येथे सीना नदीलगत सुरू असलेल्या आणि पूर्णत्वास जात असलेल्या घाटाच्या बांधकामाला अन्य ठिकाणी हलवू नये याबाबतची विनंती केली.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात मोठ्या प्रमाणात कर्जत जामखेड मतदारसंघातील पर्यटनवाढीसाठी विविध विकास कामे आमदार रोहित पवार यांनी मंजूर करून आणली होती. ती विकास कामे सुरळीत सुरू असतानाच नव्याने सत्तेत आलेल्या सरकारने सर्वच कामांना सरसकट स्थगिती लावली. या विरोधात उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाकडे मतदारसंघातील नागरिकांनी दाद मागितली होती. त्यानुसार न्यायालयाने त्यावर निर्णय देत कामांवरील स्थगिती उठवण्याचा आदेश दिला होता. १४ मार्च रोजी माननीय उच्च न्यायालयाने निर्णय दिल्यानंतरही शासनाकडून स्थगित कामे सुरू करण्यात आली नसल्याने आमदार रोहित पवार यांनी पर्यटन विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या कामांना सुरू करण्यासाठी पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा यांची भेट घेऊन माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे कामांची स्थगिती उठवण्याची विनंती केली. ज्यामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मस्थळ असलेल्या चौंडी येथील बारव, नदीकाठ घाटाचे बांधकाम, तसेच खर्डा येथील श्री संत गीते बाबा व श्री संत सिताराम बाबा समाधीस्थळ विकास यासोबतच राशीन येथील जगदंबा माता देवस्थान विकास कामे व इतर कामांचा समावेश आहे.
यासोबतच पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मस्थळ असलेल्या चौंडी येथे सीना नदीलगत घाटाचे बांधकाम सुरू आहे. परंतु हे काम थांबवून अन्य ठिकाणी करण्यासाठी काही स्थानिक नेत्यांनी मागणी केली आहे. परंतु, जुन्या घाटास कोणत्याही प्रकारे बाधा येत नसल्याने व सध्या त्या घाटाच्या पायाचे काम जवळपास पूर्ण झाले असल्याने हे काम पूर्ण करणं गरजेचं आहे. दुसऱ्या बाजूला नवीन घाट करता येईल, दोन्ही बाजूचा घाट करण्यासाठी रोहित पवारांनी पुढाकार घेतला आहे. सरकारने स्थगित केलेल्या कामांपैकी ते एक काम असल्याने एक काम 30 टक्के झाले आणि दुसरं काम स्थगित असल्याने ते सुरू होत नाही. सद्यस्थितीत हे काम तातडीने पूर्ण करण्याकरिता संबंधितांना आदेशित करावे, अशी विनंती व राशीनच्या देवीसाठी २१ कोटींचा आराखड्यातील मंजूर केलेली काम देखील स्थगितीमध्ये आहे. त्यात जो एक कोटी निधी देण्यात आला होता त्याची एजन्सीसुद्धा सरकारकडून चुकली होती ती बदलण्याची विनंतीही यावेळी मंत्री महोदयांकडे आमदार रोहित पवार यांनी केली.
दरम्यान, सद्यस्थितीत शासन निर्णयात स्थगिती देण्यात आलेल्या कामांची स्थगिती उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार उठवून ही कामे व त्याला मंजूर झालेला निधी याला कोणतीही बाधा न आणता सुरू करावी व न्यायालयाच्या आदेशाचा अवमान होऊ नये यासाठी सहकार्य करावे अशी देखील विनंती त्यांनी केली आहे.