राहुल गांधी यांनी कर्नाटकात मोहब्बत की दुकान सुरू केली
बजरंग बलीने कर्नाटकातील ४० टक्के कमीशनवाल्यांची नळी तोडली, जोरदार हल्लाबोल
मुंबई दि १४ (प्रतिनिधी)- कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निकालामुळे देशाचे राजकारण बदलणार आहे. जनतेच्या जिव्हाळ्याच्या मुद्द्यावरून लक्ष दुसरीकडे वळवून राजकीय यश मिळवता येणार नाही हे अधोरेखित झाले आहे. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा देशाच्या राजकारणावर अत्यंत सकारात्मक परिणाम झाला असून धार्मिक द्वेष निर्माण करून निवडणुका जिंकण्याचा भाजपचा डाव कार्नाटकात यशस्वी झाली नाही. यात्रा मार्गावरील हिमाचल प्रदेश यापूर्वीच काँग्रेसने जिंकले आज कर्नाटकही मोठ्या फरकाने जिंकले. यात्रा मार्गावर असलेले मध्य प्रदेश हरियाणा राजस्थान आणि छत्तीसगड मध्ये ही होऊ घातलेल्या निवडणुकांमध्ये काँग्रेसला भरघोस यश मिळेल, असा विश्वास विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला.
कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाने भाजपचा पराभव करत दणदणीत विजय मिळवला आहे. त्याबद्दल थोरात यांनी कर्नाटक मधील नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले. काँग्रेस अध्यक्ष श्री मल्लिकार्जुन खरगे माजी अध्यक्ष राहुल जी गांधी काँग्रेस सरचिटणीस प्रियंका जी गांधी यांच्यासह कर्नाटकातील सर्व नेत्यांनी जनतेच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर प्रचार केला कर्नाटक काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यामध्ये जनतेला विकासाचं विजन दाखवलं आणि काँग्रेस पक्षाच्या या विजांवर लोकांनी विश्वास ठेवला त्यामुळे कर्नाटक मध्ये काँग्रेस पक्षाला प्रचंड मोठा विजय मिळाला आहे. केंद्रीय संस्थांचा गैरवापर करून विरोधी पक्षांची सरकारे पाडायची, धमकावून भिती दाखवून आमदार फोडून सरकार स्थापन करायचे आणि भ्रष्टाचार करून पैसा कमावयचा आणि तो निवडणुकीत वापरायचा. निवडणूक प्रचारात जनतेच्या हिताच्या मुद्दे न मांडता धार्मिक ध्रुवीकरण करायचे आणि लोकांची माथी भडकावून आपला राजकीय स्वार्थ साधायचा ही भाजपची कार्यपद्धती आहे. पण कर्नाटकच्या जनतेने या सराईत लोकमत चोरांचा पराभव करून त्यांना त्यांची जागा दाखवून दिली आहे.
कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा निकाल हा देशाच्या राजकारणाला दिशा देणारा असून पुढील निवडणुका ह्या जाती धर्माच्या आधारावर जिंकता येणार नाहीत. महागाई बेरोजगारी शेतकरी गरीब दलित अल्पसंख्याक यांच्या विकासासाठी काम करणा-यांनाच आता जनतेचा आशिर्वाद मिळणार आहे. लोकांच्या हिताची कामे न करता भ्रष्टाचार करून या पैशाच्या बळावर निवडणुका जिंकता येणार नाहीत हा संदेश या निकालाने दिला आहे. त्यामुळे आगामी काळातील विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीतही कर्नाटक प्रमाणेच काँग्रेस पक्ष विजयी होईल असा विश्वास थोरात यांनी व्यक्त केला.