रवींद्र धंगेकरांनी ‘या’ कारणांमुळे जिंकला कसब्याचा गड
भाजपाला धक्का देत जिंकला कसब्याचा गड, 'हे' पाच मुद्दे ठरले किंगमेकर
पुणे दि ३(प्रतिनिधी) – पुण्यातील कसबा पेठ विधानसभा मतदारसंघात तब्बल २८ वर्षानंतर भाजप उमेदवाराचा पराभव झाला आहे. कॉंग्रेस उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी भाजप उमेदवार हेमंत रासने यांचा ११ हजार मतांनी पराभव केला आहे. पण भाजपाचा गड धंगेकरांनी कसा भेदला याचा घेतलेला आढावा.
धंगेकर यांच्या विजयाचे पहिले कारण म्हणजे धंगेकर यांना उमेदवारी देताना काँग्रेसने टाकलेला गोंधळ कारण आजवर काँग्रेसने उमेदवारी देताना कायम घोळ घातला आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघात झालेला घोळ या वेळी मात्र काँग्रेसने टाळला.धंगेकरांशिवाय महाविकास आघाडीचा दुसरा उमेदवार असता तर ही निवडणूक काँग्रेसला जड गेली असती. दुसरे कारण म्हणजे रवींद्र धंगेकर यांचा तगडा जनसंपर्क. नगरसेवक म्हणून काम करत असताना कायम लोकांसाठी उपलब्ध असणे, नेहमी जनतेत मिळून मिसळून राहणे यामुळे धंगेकरांबद्दल मतदासंघात आपुलकी होती. धंगेकर आपली दुचाकी घेऊन नागरिकांच्या सेवेसाठी कायम तत्पर असतात. याचा फायदा निवडणूकीत धंगेकरांना झाला. आपल्या जगसंपर्कामुळेच धंगेकर बापटांना आव्हान देऊ शकले होते.हेमंत रासने जनसंपर्काच्या मुद्यावरून धंगेकरांपुढे कमी पडले, त्याचा त्यांना फटका बसला.तिसरे कारण म्हणजे महाविकास आघाडीची एकजूट आजवर कसब्यात कायम तिरंगी लढत होत होती, त्याचा फायदा भाजपाला होता.धंगेकरांना उमेदवारी दिल्यानंतर कसब्यात जे वातावरण निर्माण झाले त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांची मरगळ झटकली गेली आणि ते अत्यंत जोमाने प्रचारात उतरले. महत्वाचे म्हणजे त्याला ठाकरे गट आणि राष्ट्रवादीची पुरेपूर साथ लाभली त्यामुळे भाजपाला आपला गड राखता आला नाही. चाैथे कारण म्हणजे धंगेकरांनी ही निवडणूक स्थानिक मुद्द्यावर लढवली. कसब्यातील जुने वाडे, रस्ते, ड्रेनेज लाईन, या मुद्द्यावर धंगेकर जोर देत होते. तर दुसरीकडे भाजपाला याही निवडणूकीत ३७० कलम, हिंदुत्व यावर भर दिला फडणवीस यांनी तर ओंकारेश्वर मंदिराचा मुद्दा उपस्थित करत भाजपालाच अडचणीत आणले, कारण गेली २५ वर्ष बापट या मतदारसंघाचे आमदार आहेत. त्यामुळे भाजपावरच या अपयशाचे खापर फोडण्यात आले. रवींद्र धंगेकर यांच्या विजयाचं पाचवं कारण म्हणजे, त्यांचं साध राहणीमान आजपर्यंत त्यांना कधीही कुणी कारमध्ये फिरताना बघितलेलं नाही. अगदी स्कुटीवरून फिरत ते अनेकांच्या भेटीगाठी घेतात मतदारांशी संपर्क ठेवतात. त्यांच्या विजयात या गोष्टीचा देखील महत्वाचा वाटा आहे. यामुळे धंगेकर भाजपाला आव्हान देत कसब्याचा गड सर केला.
कॉंग्रेसचे विजयी उमेदवार रवीद्र धंगेकर हे मूळचे पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील रहिवासी आहेत. धंगेकर यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरूवात पुणे शहरात शिवसेना पक्षाच्या माध्यमातून झाली. त्यानंतर राज ठाकरे शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर धंगेकर यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची वाट धरली.धंगेकर यांचे मन मनसेत फारसे रमले नाही. २०१७ साली धंगेकर यांनी तत्कालीन प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला. रवींद्र धंगेकर हे चार वेळा नगरसेवक म्हणून निवडून आहे आहेत. कसब्यात ‘आपला माणूस’ अशी धंगेकर यांची प्रतिमा त्यांच्या विजयात महत्वाची ठरली आहे.