ज्यांना तांत्रिक अडचण आली फक्त त्यांचीच फेर परीक्षा घ्या
टंकलेखन परीक्षेप्रकरणी काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची आयोग व मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी
मुंबई दि २०(प्रतिनिधी)- महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने गट-क अंतर्गत सहाय्यक व लिपीक आणि टंकलेखक या पदासाठी परीक्षा घेण्यात आली होती. टंकलेखनच्या या ऑनलाईन परिक्षेत काही विद्यार्थ्यांना तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागला होता. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने मात्र ही टंकलेखन कौशल्य चाचणी परिक्षाच रद्द करुन पुन्हा परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे.
परंतु या टंकलेखन कौशल्य चाचणी परिक्षेत ज्या विद्यार्थ्यांना तांत्रिक अडचण आली त्यांचीच फेरपरीक्षा घ्यावी सर्वांचीच फेर परीक्षा घेऊन विद्यार्थ्यांना वेठीस धरू नये अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांना पत्र लिहिले असून या पत्रात पुढे असे म्हटले आहे की, टंकलेखन कौशल्य चाचणी परिक्षेत ज्या विद्यार्थ्यांना तांत्रिक अडचण आली त्याच विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा घेण्याऐवजी सरसकट सर्वांची पुन्हा परीक्षा घेणे हे विद्यार्थ्यांवर अन्याय करणारे आहे. ज्या विद्यार्थ्यांना परिक्षेत तांत्रिक अडचण आली नाही त्यांना पुन्हा परीक्षा देण्यास सांगणे चुकीचे व अन्यायकारक आहे. असे मत मांडले आहे.
तांत्रिक अडचणींची शिक्षा त्या विद्यार्थ्यांना कशासाठी दिली जात आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना अडचण आली होती त्यांची फेरपरीक्षा घ्या व इतर यशस्वी विद्यार्थ्यांची यादी जाहीर करावी असे पटोले म्हणाले.