
सांगवी-बोपोडी पुलाचा राडा! व्हॉट्सॲप ग्रुपवर ‘ती’ पोस्ट पडली महागात; सामाजिक कार्यकर्त्याला गाठून बदडलं
तीस कोटींचा पूल आणि २२ कोटीचे सुशोभीकरण यामुळे वादात सापडलेल्या सांगवी – बोपोडी पुलाबाबत व्हॉट्सअप ग्रुपवर पोस्ट करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्याला ५ जणांवर हल्ला केल्याची तक्रार झाली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिलीप मारुतराव तनपुरे (वय ५९, रा. आनंदनगर, सांगवी) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी अभिषेक नारायण शेगडे (वय २०) आणि अंकित कुमार उर्फ कल्लू राजेश मोरया (वय १९) याच्यावर आणि तीन अल्पवयीन साथीदारांवर गुन्हा दाखल झाला आहे.

सांगवीतील माकन रुग्णालय चौकामध्ये तनपुरे हे दुचाकीवरून जात असताना शुक्रवारी (दि. १७) सायंकाळी पावणेसातच्या सुमारास संशयितांनी त्यांना पाठलाग करून अडवले. त्यांच्यावर रॉडने हल्ला केला, मारहाण केली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन आसपास सीसीटीव्ही फुटेज तपासून दोन संशयितांनी अटक केली. अन्य तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.तनपुरे यांनी नुकत्याच झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीत सांगवी येथील भाजपचे नगरसेवक आणि सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे यांच्या विरोधामध्ये अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती. सांगवी परिसरातील व्हॉट्सॲप ग्रुप निर्माण केला होता. त्या ग्रुपमध्ये तनपुरेही होते. पोस्टवरून कोणीतरी हल्ला केल्याचे फिर्यादीमध्ये नमूद केले आहे.

सांगवी भागातील भ्रष्टाचाराबाबत बोलल्यामुळेच माझ्यावर हा खुनी हल्ला करण्यात आला असून, आरोपींना राजकीय पाठबळ दिले जात आहे. प्रशांत शितोळे यांच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याचे त्यांनी म्हटले आहे.प्रकरणाशी माझा काही संबंध नाही, तनपुरे आमचे स्नेही आहेत. एकत्र काम केले आहे. त्यांना कुणीतरी फितविले आहे. या प्रकरणास चुकीचे वळण दिले जात आहे. त्यांना चुकीचे मार्गदर्शन करणाऱ्यांविरोधात आम्ही तक्रार करणार आहोत. त्यांचा शोध पोलिस घेतील.


