अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीतून ऋतुजा लटकेंचा विजय निश्चित
मॅरेथान बैठकानंतर भाजपाची माघार,परंपरा जपली,की पराभवाची भीती
मुंबई दि १७(प्रतिनिधी) – अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांच्या विजय निश्चित झाला आहे.मार्ग मोकळा झाला. अनेक मॅरेथाॅन बैठका घेतल्यानंतर भाजपाने पोटनिवडणुकीतून माघार घेतली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपुरातून यासंदर्भात घोषणा केली. राज ठाकरे यांच्या पत्रानंतर भाजप माघार घेणार असल्याची चर्चा होती.

शिवसेनेचे दिवंगत आमदार रमेश लटके यांचं निधन झाल्याने अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातील जागा रिक्त झाली होती. या जागेवर ३ नोव्हेंबर रोजी पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली आहे. या निवडणुकीवरून राज्यात प्रचंड वाद निर्माण झाले. भाजपाकडून मुरजी पटेल यांचं नाव जाहीर करण्यात आले होते. मुरजी पटेल यांनी प्रचारालाही सुरुवात केली. शिंदे गटाने उमेदवार जाहीर न करता भाजपाला पाठिंबा दिला. तर, राष्ट्रवादी-काँग्रेसने शिवसेनेला पाठिंबा जाहीर केला होता. ही निवडणूक बिनविरोध व्हावी अशी मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली. तसंच, शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांनीही पत्र लिहून बिनविरोध निवडणुकीची विनंती केली होती. बिनविरोध निवडणुकीची मागणी वाढल्याने भाजपाच्या नेत्यांमध्ये काल मध्यरात्री बैठक पार पडली. ही निवडणूक व्हावी अशी स्थानिक नेत्यांची मागणी होती. परंतु, अंतिम निर्णय देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सोपवण्यात आला. काहीच वेळापूर्वी अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपा माघार घेत असल्याची घोषणा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.त्यामुळे ऋतुजा लटके यांचा बिनविरोध निवडून येण्याचा मार्ग मोकळा झाला.
पक्षाच्या बैठकीनंतर उमेदवारी मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला. सहानुभूती आणि संस्कृती पाळली पाहिजे. आम्ही पळपुटे नाही. आम्ही लढाई लढायच्या ९१ टक्के परिस्थितीत आहोत. आम्ही पळपुटे नाही. २०२४ च्या निवडणुकीत अंधेरीत दिसेलच. २०२४ ला अंधेरीत पाहा. तेव्हा आम्हीच जिंकून येऊ.असा विश्वास भाजपाने व्यक्त केला आहे.