अंधेरी निवडणूकीतून माघार घेतल्यानंतर भाजपातील वाद चव्हाट्यावर
कार्यकर्त्यांची राज ठाकरेंच्या नावाने घोषणाबाजी, पटेल समर्थकांना अश्रू अनावर
मुंबई दि १७(प्रतिनिधी)- अंधेरी पुर्वच्या पोटनिवडणूकीत ऋतुजा लटके यांच्या विरोधातील भाजप उमेदवार मुरजी पटेल यांनी पक्षाच्या आदेशानंतर माघार घेतली. अनेक घडामोडीनंतर माघार घेतल्यामुळे अंधेरीतील मुरजी पटेल यांचे कार्यकर्ते प्रचंड आक्रमक झाले आहेत.
चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुरजी पटेल हे अंधेरी पोटनिवडणुकीतून माघार घेत असल्याची घोषणा केली. त्यानंतर अंधेरीत मुरजी पटेल यांच्या कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. मुरजी पटेल यांच्या कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांच्याविरोधात घोषणाबाजी करायला सुरुवात केली. ‘राज ठाकरे मुर्दाबाद’च्या घोषणा दिल्या. प्रचार सुरु केल्यानंतर पटेल यांना माघार घ्यायला लावल्यामुळे भाजप कार्यकर्त्यांनी पक्षाच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. कार्यकर्त्यांनी ‘सगळे चोर आहेत’, अशी संतप्त प्रतिक्रिया देत आपल्या भावनांना मोकळी वाट करून दिली. भाजपचे उमेदवार मुरजी पटेल यांना माघार घेण्यास सांगितल्यानंतर अंधेरीमध्ये भाजपच्या गोटात शांतता पसरली. यावेळी पटेल यांच्या कार्यकर्त्यांकडून पक्षाविरोधात आक्रमक भूमिका घेतल्याचे देखील पाहायला मिळत आहे.

भाजपच्या या निर्णयाबाबत बोलताना मुरजी पटेल म्हणाले, की मी पक्षाचा आदेश मानणारा कार्यकर्ता आहे. मी अजिबात नाराज नाही. मी पक्षाचा आदेश मान्य करतो. पक्षाने याबाबतचा निर्णय सांगताच एकाही मिनिटाचा विचार न करता अर्ज मागे घेतला आहे. पण कार्यकर्ते मात्र नाराज आहे.