सांगली शहरातील कर्नाळ रोड येथील दत्तनगर मध्ये आशिष चिंचवाडे यांच्या बंगल्यात धाडसी चोरी करण्यात आली आहे. यामध्ये बंगल्याचे मालक आशिष चिंचवाडे यांचे हातपाय बांधून त्यांच्या आईच्या गळ्यातील सव्वा आठ तोळे सोन्याचे दागिने आणि कपाटामधील 100 ग्रॅम चांदी आणि दोन लाखाची रोकड असा ऐवज अज्ञात चोरट्यानी लंपास केला. मध्यरात्री तीन वाजण्याच्या सुमारास हा चोरीचा प्रकार घडला आहे .
कर्नाळा रोडवरील झेंडा चौक येथील बंगल्यात चिंचवाडे कुटुंबीय राहतात. गुरुवारी रात्री नेहमी प्रमाणे चिंचवाडे कुटुंबीय जेवण करून झोपले होते. पहाटे सव्वा तीन वाजण्याच्या सुमारास सहा दरोडेखोरांच्या टोळीने त्यांच्या बंगल्याच्या दरवाजाचा कडी कोयंडा तोडून आत प्रवेश केला. मोठा आवाज आल्याने चिंचवाडे झोपेतून उठले. यावेळी सहा दरोडेखोरांनी आशिष यांचे हातपाय बांधले आणि त्यांच्या आईंना स्टीलचा रॉड आणि लोखंडी कटरसह हत्यारांनी मारण्याची धमकी देऊन त्यांच्या जवळ असणारे दागिने आणि रोख रक्कम दोन लाख रुपये काढून घेतली. यामध्ये एक लाख रुपये किमतीचे पाच तोळे वजनाच्या पाटल्या, 40 हजार रुपये किंमतीची 21 ग्रॅमची सोन्याचे चेन, 5 ग्रॅम वजनाच्या दहा हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या तीन अंगठ्या, 5 हजार रुपये किमतीचे चांदीचे 100 ग्रॅम वजनाचे पैंजण, करदोडा, छल्ला, निरांजन, 8 हजारांचे 8 ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र, 20 हजारांचे ५ ग्रॅम वजनाचे कानातील टॉप्स यांचा समावेश आहे.