Just another WordPress site

 शिवसेना खासदार संजय राऊत यांना अखेर अटक

ईडीच्या कारवाईने महाराष्ट्रातील राजकीय संघर्ष वाढणार

मुंबई दि १(प्रतिनिधी)-

शिवसेना खासदार संजय राऊत यांना अखेर रात्री उशिरा ईडीने अटक केली.पत्राचाळ प्रकरणी १०३४ कोटींच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाची ईडीकडून चौकशी करण्यात येत आहे. चौकशीदरम्यान, संजय राऊतांच्या घरी साडे अकरा लाख रुपयांची रोकड सापडली असून ईडीने ही रक्कम जप्त केली आहे. राऊत यांच्या अटकेमुळे जोरदार राजकीय वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

रविवार सकाळी सात वाजल्यापासून ईडीने संजय राऊत यांच्या घरी धाड टाकून चौकशी सत्र सुरू केले होते. घरात साडेनऊ तास चौकशी केल्यानंतर त्यांना दक्षिण मुंबईतील ईडी कार्यालयात नेण्यात आले होते. त्यानंतर ईडी कार्यालयातही त्यांची आठ तास चौकशी करण्यात आली. तब्बल १७ तासांहून अधिक तास त्यांची चौकशी केल्यानंतर राऊत यांना अटक करण्यात आली. संजय राऊत यांच्या वकिलांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांचा जबाब नोंदवण्यात आला आहे. तसंच, पत्राचाळ प्रकरणी एकही कागद ईडीला मिळाला नसल्याची माहितीही वकिलांनी दिली आहे.

 

GIF Advt

नक्की पत्राचाळ प्रकरण काय?

मुंबईतील गोरेगाव येथील पत्राचाळ जमीनप्रकरणी १ हजार ३४ कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप आहे. पत्राचाळीत महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास प्राधिकरणाचा (म्हाडा) भूखंड आहे. ईडीच्या आरोपानुसार प्रवीण राऊत यांच्या गुरू आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीला ही चाळ विकसित करण्याचे काम देण्यात आले होते, मात्र त्यांनी या जागेचा काही भाग खासगी बिल्डरांना विकला असा आरोप आहे.

दरम्यान अनिल देशमुख, नवाब मलिक, आणि आता संजय राऊत यांना अटक झाल्यामुळे पुन्हा एकदा महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असा राजकीय वाद रंगण्याची शक्यता आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!