शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाच्या अध्यक्षीय सुनावणीचे वेळापत्रक ठरले?
आमदार अपात्रेची अशी होणार सुनावणी, या दिवशी येणार अंतिम निकाल, यामुळे आमदार अपात्रतेचा निकाल लांबणार?
मुंबई दि २६(प्रतिनिधी)- राज्याच्या राजकारणात महत्वाचा मुद्दा ठरलेल्या शिवसेना आमदार अपात्रतेच्या प्रकरणाचे वेळापत्रक समोर आले आहे. शिवसेना अपात्रतेचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेल्यानंतर न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांना सुनावनीचे वेळापत्रक सादर करण्याच्या सुचना दिल्या होत्या. याप्रकरणी एकूण ३४ याचिका असून आजच्या सुनावणीनंतर या याचिकांचे वेळापत्रक जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात होती.
या प्रकरणाच्या सुनावणीची रुपरेषा, प्रक्रिया आणि वेळापत्रक अध्यक्ष ठरवणार असून याबाबत दोन्ही गटांना अद्याप माहिती दिलेली नाही. असा दावा करण्यात आला होता. पण आता वेळापत्रक समोर आले आहे. एका आठवड्यात विधानसभा अध्यक्षांसमोर सुनावणी केली जावी आणि त्यात अपात्रतेच्या सुनावणीसाठी पुढील कारवाईच्या तारखा निश्चित केल्या जाव्या, असे निर्देश सुप्रीम कोर्टाने १८ सप्टेंबर रोजी दिले होते. अध्यक्ष विधिमंडळाच्या बाबतीत सार्वभौम आहेत, पण कोर्टाने दिलेल्या आदेशांचाही आदर राखला जावा असं सरन्यायाधीश म्हणाले होते. शिवसेनेच्या आमदारांना सुनावणीचे वेळापत्रक पाठवण्यात आले आहे. १३ ऑक्टोबर ते २३ ऑक्टोबरदरम्यान यु्क्तिवाद होऊन डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात या प्रकरणी निकाल येण्याची शक्यता आहे. १३ ते २० ऑक्टोबरदरम्यान दोन्हीही गटांनी एकमेकांना दिलेली कागदपत्रांची पडताळणी केली जाईल. यानंतर २० ऑक्टोबर रोजी सर्व कागदपत्रे एकत्र करायची की नाही, याबाबतचा निर्णय घेतला जाणार आहे. २७ ऑक्टोबरला दोन्ही गट आपलं म्हणणं मांडतील. ६ नोव्हेंबरपर्यंत दोन्ही गट आपले मुद्दे लिखित स्वरूपात सादर करतील. यानंतर त्यांना दावे-प्रतिदावे करण्यासाठी वेळ देण्यात येणार आहे. २३ नोव्हेंबरला साक्षीदारांची उलट साक्ष घेतली जाईल. त्यानंतर दोन आठवड्यांमध्ये अंतिम निकालदेण्यात येणार आहे. साधारण डिसेंबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात यासंदर्भातला निकाल येण्याची शक्यता आहे. मागील सुनावणीत शिंदे आणि ठाकरे या दोन्ही गटाकडून जोरदार युक्तिवाद करण्यात आला होता. सर्वोच्च न्यायालयातही या प्रकरणी सुनावणी होणार आहे. त्यावेळेस राहुल नार्वेकर यांनाही कोर्टाला आतापर्यंत काय-काय झाले याचा तपशील द्यावा लागणार आहे.
आमदार अपात्रतेची पुढील सुनावणी १३ ऑक्टोबरला होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. आजच्या सुनावणीला ठाकरे गटाकडून अनिल परब, अनिल देसाई, सुनील प्रभू उपस्थित होते. राज्यातील सत्तासंघर्षाचा तिढा न्यायालयात गेल्यानंतर आमदार अपात्रतेसंदर्भात विधानसभाध्यक्षांच्या दरबारी निर्णय घेण्याचे आदेश देण्यात आले होते.