आगामी विधानसभा निवडणूकीत मुख्यमंत्र्यांचाच पत्ता होणार कट?
भाजपाची मोठी खेळी मुख्यमंत्र्यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता धुसर, अनेक विद्यमान मंत्र्यांचा पत्ता कट होणार?
भोपाळ दि २७(प्रतिनिधी)- येत्या काही दिवसात राजस्थान, छत्तीसगड आणि मध्यप्रदेशमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. पण त्याआधीच मध्यप्रदेशमध्ये भाजपाकडून मोठ्या प्रमाणात फेरबदल होणार आहेत. त्यातील एक महत्वाचा फेरबदल म्हणजे भाजपाकडुन विद्यमान मुख्यमंत्री शिवराज सिंग चाैहान यांचाच पत्ता कट होण्याची शक्यता आहे. कारण मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाने उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. त्यात चाैहान यांच्या नावाचा समावेश नसल्यामुळे चर्चा होत आहे.
राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेसचीच सत्ता येणार असा ओपिनियन पोलचा अंदाज आहे. त्यामुळे मध्य प्रदेशमध्ये सत्ताधारी भाजपा स्वबळावर पूर्ण बहुमत मिळवून सरकार स्थापन करण्याच्या उद्देशाने रिंगणात उतरत आहे. मध्य प्रदेशात विद्यमान मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्यासह संपूर्ण मंत्रिमंडळाचे तिकीट कापले जाऊ शकते, अशी चर्चा भाजपच्या गोटात सुरू आहे. त्यामुळे ओठे आश्चर्य व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे भाजपाने केंद्रीय मंत्रिमंडळातील मंत्र्यांना आणि खासदारांनाही तिकीट दिले आहे. त्याचीही जोरदार चर्चा होत आहे. केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्यापासून प्रह्लाद पटेल, भग्गन सिंह कुलस्ते आणि राष्ट्रीय सरचिटणीस कैलाश विजयवर्गीय यांना भाजपाने उमेदवारी दिली आहे. चाैहान २००५ पासून राज्याचे मुख्यमंत्री आहेत. पण यावेळी भाजपाने सामूहिक नेतृत्वात निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. निकालानंतर मुख्यमंत्री पदाबाबत निर्णय होईल. त्यामुळे मध्य प्रदेशात मुख्यमंत्रीपदाचा पर्याय खुला ठेवत भाजपाने चाैहान यांना इशारा दिल्याची चर्चा होत आहे. भाजपाने आत्तापर्यंत कृषि मंत्री नरेंद्र सिंह तोमर, केंद्रीय मंत्री फग्गन सिंह कुलस्ते, केंद्रीय मंत्री प्रह्लाद पटेल, खासदार राकेश सिंह, खासदार गणेश सिंह, खासदार रीति पाठक यांना उमेदवारी दिली आहे. यातील एकाच्या गळ्यात मुख्यमंत्री पदाची माळ पडण्याची शक्यता आहे. दरम्यान आतापर्यंत भारतीय जनता पक्षाने २३० जागांच्या विधानसभेसाठी ७८ उमेदवारांची उमेदवारी जाहीर केली आहे. अनेक जागांवर अद्याप उमेदवार जाहीर व्हायचे आहेत, त्यामुळे पक्षाकडून आणखी अनेक मोठ्या नावांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मध्यप्रदेशमध्ये २०१८ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने राज्यात केवळ १०९ जागा जिंकल्या होत्या. तर ११४ जागांवर काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले होते. पण ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या गटातील आमदारांच्या राजीनाम्यामुळे कमलनाथ यांचे सरकार पडले आणि शिवराज सिंह चौहान पुन्हा राज्याचे मुख्यमंत्री झाले होते.