पुरोगामी महाराष्ट्रात मेंढ्या चारण्यासाठी चक्क मुलांची विक्री
या जिल्ह्यात मोठ्या रॅकेटचे धागेदोरे पोलिसांच्या हाती
नाशिक दि ८ (प्रतिनिधी) – एकीकडे समाज कितीही प्रगत होत असला तरीही काही ठिकाणी आजही जुन्या पद्धती आणि मानवी जिवाची तस्करी केली जात असल्याचे नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यात दिसून आले आहे. मेंढ्या चारण्यासाठी आदिवासी समाजातील चिमुकल्यांची चक्क खरेदी-विक्री केली जात असल्याचे समोर आले आहे. या आदिवासी बालकांची किंमत म्हणून त्यांच्या पालकांना एक मेंढी आणि ३ ते ५ हजार रुपयांची रक्कम देऊन हा सौदा पुर्ण करण्यात येतो. आदिवासी समाजातील ही बालके ६ ते १५ वयोगटातील असतात, त्यांचा सौदेबाजी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार मेंढी पाळण्यासाठी ३ हजारांत सौदा झालेल्या दिलेल्या एका आदिवासी मुलीचा बेदम मारहाणीमुळे मृत्यू झाला होता. हा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर यामागे एक रॅकेट असल्याचे समोर आले आहे. इगतपुरी तालुक्यातील आदिवासी कातकरी पाड्यांवरील ३० चिमुकल्यांचा सौदेबाजार झाल्याचेही समोर आले आहे. आदिवासी समाजातील मागासलेपण, अशिक्षितपणा, दारिद्र्य याचा फायदा घेऊन काही भामट्यांकडून या चिमुकल्यांची खरेदी केली जात आहे. एक मेंढी आणि ३ हजार ते ५ हजार रुपयांच्या बदल्यात मुलांचा हा सौदा केला जात आहे. मेंढ्या चारण्यासाठी नगर जिल्ह्यातील मेंढपाळांकडून ३० मुलांची खरेदी करण्यात आली होती. सौदा झाल्यानंतर या चिमुकल्यांचं आयुष्य गुलामाप्रमाणे होऊन जाते.याप्रकरणी एक एजंट फरार झाला आहे, तर एकाला अकोले पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.
अल्पवयीन मुलांना वेठबिगारी, बालमजुरी आणि अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत नाशिक जिल्ह्यातील घोटी आणि नगर जिल्ह्यातील घुलेवाडी तसेच अकोले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.यानंतर काही मुलांची प्रशासनाकडून सुटका करण्यात आली आहे, तर काही जणांचा शोध सुरु आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर इतर कोठे असे रॅकेट आहे का याचा शोध पोलीस घेत आहेत.