Latest Marathi News

अशा पद्धतीने शरद पवारांनी जिंकली होती घड्याळ चिन्हाची लढाई

आजच्या शिवसेनेसारखी स्थिती राष्ट्रवादीतही झाली होती, बघा काय होता 'तो' वाद

मुंबई दि १०(प्रतिनिधी)- शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या गटात लढाई सुरू होती. पण निवडणूक आयोगाने चिन्ह आणि नाव गोठवले आहे. पण ब-याच जणांना माहित नसेल की आज शिवसेनेत जी परिस्थिती आहे तशीच परिस्थिती १८ वर्षापूर्वी राष्ट्रवादीत तयार झाली होती. त्यावेळी शरद पवारांनी ही लढाई जिंकली होती.पाहूया तो संघर्ष काय होता.

सोनिया गांधी यांच्या विदेशीपणाचा मुद्दा उपस्थित करीत काँग्रेसमधील शरद पवार, पी. ए. संगमा आणि तारिक अन्वर यांनी १९९९मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. पण २००४च्या लोकसभा निवडणुकीत सोनिया गांधी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत शरद पवार यांनी काँग्रेसबरोबर आघाडी करण्याचा निर्णय घेतला. सोबत राष्ट्रवादीला यूपीएमध्ये सामील केले. पण या निर्णयाला पी. ए. संगमा यांनी विरोध दर्शविला होता. त्याचबरोबर संगमा यांच्या नेतृत्वाखालील गटाने शरद पवार यांची अध्यक्षपदावरून हकालपट्टी केली आणि संगमा स्वत अध्यक्ष झाले.त्याचबरोबर त्यांनी घड्याळ चिन्ह आपल्याला मिळावे असा दावा केला. अर्थातच ती लढाई आत्ताप्रमाणे निवडणूक आयोगाकडे गेली. निवडणूक आयोगाने आत्ता शिवसेनेच्या दोन गटाला जसे आदेश दिले तसेच त्या वेळेस राष्ट्रवादीच्या दोन गटाला दिले. संगमा यांना ईशान्येकडील राज्यांमधील लोकप्रतिनिधींचा पाठिंबा मिळाला होता. तर महाराष्ट्रासह अन्य राज्यांमधील खासदार-आमदार आणि पदाधिकाऱ्यांनी शरद पवार यांच्या समर्थनार्थ प्रतिज्ञापत्रे सादर केली. निवडणूक आयोगासमोर पवार आणि संगमा गटानेआपले मुद्दे मांडले. दोन्ही गटांचे म्हणणे ऐकल्यावर निवडणूक आयोगाने शरद पवार यांना पक्ष संघटना आणि लोकप्रतिनिधींचा अधिक पाठिंबा असल्याने पक्षावरील त्यांचे नियंत्रण मान्य करीत घड्याळ हे चिन्ह शरद पवार यांच्याकडेच कायम ठेवले. त्याचबरोबर संगमा यांचा पक्षावरील हक्क संपल्याने पक्ष पूर्णपणे पवारांच्या ताब्यात आला.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केल्यानंतर शरद पवार यांनी चरखा चिन्हावर दावा केला होता. कारण शरद पवार हे समाजवादी काँग्रेसचे अध्यक्ष असताना चरखा हे पक्षाचे चिन्ह होते.पण १९८६ साली पवारांनी समाजवादी काँग्रेसचे काँग्रेसमध्ये विलीनीकरण केले. परंतु केरळमधील गटाने समाजवादी काँग्रेसचे अस्तित्व कायम ठेवले. त्यामुळे राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर चरखा चिन्हासाठी पवारांनी प्रयत्न केले, पण केरळमधील पक्षाने चिन्ह सोडण्यास नकार दिल्यानंतर राष्ट्रवादीला घड्याळ चिन्ह देण्यात आले.

आज शिवसेनेत ठाकरे गट आणि शिंदे गटात हाच वाद सुरु आहे लोकप्रतिनिधींचा शिंदेना तर ठाकरेंना संघटनेचा पाठिंबा आहे. पण सध्या चिन्ह गोठवण्यात आल्यामुळे मुळ पक्ष कोणाचा याचा निर्णय येण्यास वेळ लागणार आहे. त्यामुळे सध्या तरी पर्यायी चिन्ह घेऊन दोघांना वाटचाल करावी लागणार आहे.

 

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!