शरद पवारच राष्ट्रवादीचे एकमेव बाॅस, राजीनामा मागे
नेते कार्यकर्त्यांच्या हट्टापुढे शरद पवारांची माघार, राजीनामा मागे घेत केली 'ही' मोठी घोषणा
मुंबई दि ५(प्रतिनिधी)- मी अध्यक्षपद सोडू नये म्हणून सगळ्यांनी विनंती केली. राष्ट्रवादीच्या बैठकीमध्ये घेतलेला निर्णय या सगळ्यांचा विचार करू मी पुन्हा सरत शेवटी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा निर्णय मागे घेत आहे, असं म्हणत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपला निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारच असतील हे निश्चित झाले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय शरद पवार यांचा राष्ट्रीय अध्यक्ष पदाचा राजीनामा देत सर्वांना धक्का दिला होता. पण आज निवड समितीने त्यांचा राजीनामा नामंजूर करत परत अध्यक्ष होण्याची विनंती केली होती. त्यावे़ळी शरद पवार यांनी विचार करण्यासाठी वेळ देण्याची मागणी केली होती. पण अखेर शरद पवार यांनी आपला राजीनामा मागे घेतला, ते म्हणाले “लोक माझे सांगाती हेच माझ्या सार्वजनिक जीवनाचे गमक आहे. माझ्याकडून आपल्या भावनांचा अनादर होऊ शकत नाही. आपण दर्शवलेलं प्रेम आणि विश्वास मी भारावून गेलो. माझ्या निर्णयापासून परावृत्त होण्यासाठी आपल्या सर्वांनी केलेली आवाहने तसेच राष्ट्रवादी पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांच्या बैठकीत त्यांनी घेतलेला निर्णय जो माझ्यापर्यंत पोहोचवला गेला. या सर्वांचा विचार करुन मी पुन्हा अध्यक्षपदी राहावे, या निर्णयाचा मान राखून मी माझा निर्णय मागे घेत आहे, असे जाहीर केले पण त्याचवेळी मी पुनश्च: अध्यक्षपद स्वीकारत असलो तरी संघटनेमध्ये कोणतेही पद अथवा जबाबदारी सांभाळणारे उत्तराधिकारी निर्माण होणे आवश्यक असते असे माझे स्पष्ट मत आहे. माझ्या पुढील कार्यकाळात पक्षामध्ये संघटनात्मक बदल करणे, नव्या जबाबदाऱ्या सोपविणे, नवीन नेतृत्व निर्माण करणे यावर माझा भर असेल. असे सांगत नवीन नेतृत्व तयार करणार असल्याचे सांगितले आहे. पण पवार यांनी आपला निर्णय जाहीर करताच राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडत आपला आनंद जाहीर केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावरून पायउतार होण्याची घोषणा केली होती. त्यांच्या या निर्णयाला राज्यभरातील राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी विरोध केला होता. पण अखेर तीन दिवसाच्या विविध घडामोडीनंतर पवार यांनी आपला राजीनामा मागे घेतल्याने या सर्व नाट्यावर पडदा पडला आहे. पण शरद पवार यांच्या या राजीनामा खेळीचे पडसाद देशाच्या आणि राज्याच्या राजकारणात उमटणार का? हे पहावे लागणार आहे.