
TCS च्या नाशिक युनिटमध्ये जबरदस्तीने धर्मपरिवर्तन केल्याचा आरोप असलेल्या निदा खानचा पोलीस शोध घेत आहेत. याच दरम्यान कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार निदा प्रेग्नेंट आहे. यामुळेच सध्या फरार असलेल्या निदाने नाशिकच्या स्थानिक न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला असून, त्यामध्ये तिने आपल्या प्रकृतीचं कारण मुख्यत्वे नमूद केलं आहे.

निदा ही ‘एचआर’ असल्याचं आधी सांगितलं जात होतं, परंतु प्रत्यक्षात ती ‘प्रोसेसिंग असोसिएट’ आहे. तिला या प्रकरणात विनाकारण अडकवण्यात येत असल्याचा दावा तिच्या कुटुंबीयांनी केला आहे.

निदा खानचे वकील बाबा सिद्दकी यांनी दिलेल्या माहितीनुसार, “निदाचे आई-वडील प्रचंड धक्क्यात आहेत. त्यांच्या मते, त्यांच्या मुलीने काहीही केलेलं नाही आणि तिला मुद्दाम अडकवलं जात आहे. निदा २०२१ मध्ये टीसीएस बीपीओमध्ये रुजू झाली होती आणि ती एचआर नसून प्रोसेसिंग असोसिएट आहे.” २५ वर्षीय निदाने २०२१ मध्ये नाशिक येथील टीसीएसच्या बीपीओ युनिटमध्ये काम करण्यास सुरुवात केली होती.

टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसच्या आठ महिला कर्मचाऱ्यांनी त्यांच्या वरिष्ठ सहकाऱ्यांवर लैंगिक छळ आणि जबरदस्तीने धर्मपरिवर्तन केल्याचा आरोप केला आहे. या आठ कर्मचाऱ्यांनी नोंदवलेल्या तक्रारींच्या तपासासाठी पोलिसांनी या आठवड्याच्या सुरुवातीला एसआयटीची स्थापना केली. वरिष्ठ सहकाऱ्यांनी आपला मानसिक आणि लैंगिक छळ केला आणि एचआर विभागाने या तक्रारींकडे दुर्लक्ष केलं असा दावा पीडित कर्मचाऱ्यांनी केला होता. पोलिसांनी या प्रकरणी कंपनीच्या महिला एचआर मॅनेजरसह एकूण आठ जणांना अटक केली आहे.

