शेवाळेवाडी चाैकात भरदिवसा कोयता नाचवत दुकानाची तोडफोड
धंदा करायचा असेल तर हप्ता द्यावाच लागेल म्हणत पसरवली दहशत, पुण्यात कोयता गँगचा पुन्हा हैदोस
पुणे दि १४(प्रतिनिधी)- पुण्यातील शेवाळेवाडीत एका स्वीटच्या दुकानात रेड बुल आणि बाकरवडी घेतल्यानंतर त्याचे पैसे मागितल्याने दुकानाची तोडफोड करणाऱ्या तिघांना पोलीसांनी अटक केली आहे. यावेळी या टोळक्याने हातात कोयता घेत परिसरात दहशत माजवण्याचा प्रयत्न देखील केला होता.
अजय उर्फ अज्याभाई विजय साळुंखे, शुभम मधुकर गवळी, सुदाम लक्ष्मण साळुंखे या तिघांना हडपसर पोलीसांनी अटक केली आहे. तर हिराराम चेनाराम देवासी यांनी याबाबत तक्रार दाखल केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, देवाशी यांचे शेवाळेवाडी चाैकात चैतन्य स्वीट मार्ट नावाचे दुकान आहे. घटनेच्या दिवशी तीन आरोपी दुकानात आले त्यांनी बाकरवडी आणि रेड बुल, आणि पाणी बाटली सारख्या वस्तू घेतल्या. यानंतर दुकानदाराने त्यांना पैसे मागितल्यावर त्यांनी दुकानदाराला धमकावत “तुम्ही लोकं बाहेरुन येऊन येथे धंदा करता, तुम्हाला येथे धंदा करायचा असेल तर, तुम्हाला आम्हाला प्रत्येक महिना ५ हजार रुपये हप्ता द्यावा लागेल, नाही तुला व तुझे दुकान देखील फोडीन,” अशी धमकी दिली. त्यानंतर हातात कोयता घेत दुकानाची तोडफोड केली. तसेच “येथे जर धंदे करायचा असेल तर प्रत्येकाने आम्हाला महिन्याला हप्ता द्यावा लागेल नाहीतर एकएकाला त्याच्या दुकानासोबत फोडून टाकू,” अशी धमकी देत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला.
फिर्यादीने तक्रार दिल्यानंतर हडपसर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे. सहायक पोलीस निरीक्षक दाभाडे अधिक तपास करीत आहेत. विशेष म्हणजे याआधीही चैतन्य स्वीटमध्ये तोडफोड करत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता.