ठाणे रुग्णालयातील ते १८ मृत्यू सरकारच्या अनास्थेमुळेच
राज्यातील सरकारी रुग्णालयेच आजारी, मोफत उपचार ही पोकळ घोषणा, भ्रष्ट सरकार सत्तेत
मुंबई दि १४(प्रतिनिधी)- ठाणे महानगरपालिका रुग्णालयात एकाच रात्रीत १८ जणांचा मृत्यू होतो ही राज्यासाठी लाजीरवाणी घटना आहे. याआधी दोन दिवसापूर्वी याच रुग्णालयात ५ जणांचा मृत्यू झाला पण सरकारचे डोळे उघडले नाहीत. केईम रुग्णालयात एका लहान मुलाचा हात कापण्याची वेळ आली तर नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील आदिवासी गरोदर महिलेचा मृत्यूही अशाच बेजबाजदारपणामुळे झाला आहे. हे सर्व सरकारी अनास्थेचे बळी असून चौकशी करायची असेल तर या राज्यातील भ्रष्ट सरकारचीच करा, अशी संतप्त प्रतिक्रिया महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे.
टिळक भवन येथे प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, ठाणे रुग्णालयात निर्दोष लोकांचा मृत्यू झाला, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शहरातील शासकीय रुग्णालयाची ही स्थिती आहे तर राज्यातील ग्रामीण भागातील सरकारी रुग्णालयातील स्थिती काय असेल याचा विचार न केलेला बरा. सरकारी आरोग्य व्यवस्थाच आजारी आहे, रुग्णालयात डॉक्टर, नर्सेस नाहीत व औषधेही नाहीत आणि सरकार मात्र १५ ऑगस्टपासून सर्व सरकारी रुग्णालयातून मोफत उपचार देऊ अशी घोषणा करते, ही केवळ पोकळ घोषणा असून स्वतःची पाठ थोपटवून घेण्याचा हा प्रकार आहे. शरद पवार व अजित पवार यांच्या पुण्यातील भेटीवर प्रश्न विचारला असता नाना पटोले म्हणाले की, अशा भेटीमुळे जनतेत संभ्रम निर्माण होत आहे, त्यांचे नातेवाईक आहेत तर घरी भेट घेता येते पण झोपून गाडीत जाणे व गुप्तपणे बैठक घेणे कशासाठी? शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी झालेल्या भेटीत यावर चर्चा करण्यात आली आहे. राहुल गांधी यांच्याबरोबरही चर्चा झाली असून त्यांना याबाबत माहिती दिली आहे. काँग्रेस हायकमांडदेखील यावर लक्ष ठेवून आहे. मुंबईत होणाऱ्या इंडिया आघाडीच्या बैठकीत याबाबत त्यांच्याबरोबर चर्चा केली जाईल.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ३ सप्टेंबर पासून राज्यात पदयात्रा सुरू करणार असून पहिला टप्पा १७ सप्टेंबरपर्यंत असेल. त्यानंतर गणेशोत्सव व सणानंतर दुसरा टप्पा सुरु करण्यात येईल. भाजपाचे केंद्र आणि राज्य सरकार जनतेच्या पैशांची लूट करत आहे. भ्रष्टाचाराचे विक्रम या सरकारने केले आहेत. शेतकरी हवालदिल आहे, पेरण्या नाहीत, जिथे पेरणी झाली तिथे पीक वाळून जात आहे, अवकाळी पावसाचा मोबदला अद्याप दिला नाही, शेतकरी आत्महत्या वाढत आहेत. शेतीला १२ तास वीज देण्याची घोषणा सरकारने केली पण ८ तासही वीज मिळत नाहीत. पाणी आहे पण वीज नाही म्हणून शेतीला पाणी देता येत नाही. रेशन दुकानात धान्य नाही, तरुणवर्गाच्या हाताला काम नाही, कंत्राटी नोकर भरती केली जात आहे, परिक्षा शुल्काच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची विद्यार्थ्यांकडून लूट केली जात आहे. कृत्रिम महागाईने जनता त्रस्त आहे, हे सर्व प्रश्न पदयात्रेदरम्यान जनतेच्या समोर मांडले जातील असे नाना पटोले म्हणाले आहेत.