शिंदे-फडणवीस सरकारला मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृत महोत्सवी वर्षाचा विसर
मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सवी वर्ष गौरव समितीकडून महाराष्ट्रदिनी विविध कार्यक्रम
मुंबई दि ३० (प्रतिनिधी)- मराठवाडा मुक्ती संग्रामाचे यंदा ७५ वे वर्ष असून हे अमृत महोत्सवी वर्ष मोठ्या प्रमाणात साजरे करून मराठवाडा मुक्तीसंग्रामात बलिदान दिलेल्या हुतात्म्यांचे व स्वातंत्र्याचे स्मरण करून त्यांना अभिवादन करणे, नव्या पिढीला मुक्तीसंग्रामाच्या लढ्याची माहिती व्हावी या उद्देसाने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने मराठवाड्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
१ मे रोजी महाराष्ट्र दिनी मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यात ध्वजारोहणानंतर मराठवाडा मुक्तीसंग्राम स्तंभापर्यंत प्रभात फेरी काढून स्वातंत्र्य सैनिकांना अभिवादन करण्यात येणार आहे. मराठवाड्यातील जनतेच्या लढ्यानंतर आणि स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली हजारो स्वातंत्र्य सैनिकांनी केलेल्या मराठवाडा मुक्ती संग्राम लढ्यानंतर १७ सप्टेंबर १९४८ रोजी मराठवाडा निजामाच्या जोखडातून मुक्त झाला. या ऐतिहासिक लढ्याला यावर्षी ७५ वर्ष पूर्ण होत आहेत. मराठावाडा मुक्तीसंग्रामाचे हे अमृत महोत्सवी वर्ष मोठ्या प्रमाणात साजरे करण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला होता त्यासाठी एक समितीही स्थापन केली होती मात्र राज्यातले सरकार बदलताच सत्तेवर आलेल्या शिंदे-फडणवीस सरकारला मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृत महोत्सवी वर्षाचा विसर पडला. काँग्रेस पक्षाने वारंवार शिंदे-फडणवीस सरकारला मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सवी वर्षाची आठवण करून दिली मात्र सत्तेची मलई खाण्यात गुंग असलेल्या या सरकारला मराठवाड्यातील जनतेच्या या लढ्याची व मराठवाडा मुक्ती संग्रामाची जाणीव नाही. काँग्रेस पक्षानेच माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली एका समितीची स्थापना करून मराठवाडा मुक्ती संग्रामाचे अमृत महोत्सवी वर्ष मोठ्या प्रमाणात साजरे करून स्वातंत्र्यसैनिक व हुतात्म्यांना अभिवादन करण्याचा, नव्या पिढीला मराठवाडा मुक्ती संग्राम लढ्याच्या इतिहासाची ओळख करून देण्याचा निर्णय घेतला.
समितीमार्फत १ मे २०२३ ते १७ सप्टेंबर २०२३ पर्यंत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. याच कार्यक्रमाचा भाग म्हणून १ मे रोजी महाराष्ट्र दिनी संपूर्ण संपूर्ण मराठवाड्यात ध्वजारोहण झाल्यानंतर ध्वजारोहणाचे ठिकाण ते मराठवाडा मुक्ती संग्राम स्मारकापर्यंत प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले आहे. मराठवाड्याला मुक्त करण्यासाठी आपल्या प्राणांचे बलिदान देणाऱ्या सर्व हुतात्म्यांना व स्वातंत्र्यसैनिकांना अभिवादन करण्यात येणार आहे.